नवी दिल्ली : गेल्या काही काळापासून कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरेपीचा वापर केला जात होता. या उपचारपद्धतीमुळं रुग्णांना मोठी मदत मिळत असल्याचंही सांगण्यात आलं होतं. पण, सोमवारी आयसीएमआरनं दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या प्रौढ वयोगटातील रुग्णांवर करण्यात येणाऱ्या उपचारांमधून प्लाझ्मा थेरेपीला वगळ्यात येत आहे. प्लाझ्मा थेरेपीफारशी प्रभावी नसल्याची माहिती आरोग्य तज्ज्ञांक़डून देण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. 


सोबतच आयसीएमआरकडून कोरोनाबाधितांवरील उपचारांच्या प्रक्रियेला तीन भागांमध्ये विभागण्यात आलं आहे. यामध्ये कमी लक्षण असणारे रुग्ण, मध्यम लक्षण असणारे रुग्ण आणि गंभीर लक्षणं असणारे रुग्ण असे तीन गट करण्यात आले आहेत. कमी स्वरुपात कोरोनाची लक्षणं असणाऱ्या रुग्णांना गृह विलगीकरणात राहण्याचा सल्ला आयसीएमआरनं दिला आहे. तर, मध्यम आणि गंभीर लक्षणं असणाऱ्या रुग्णांना अनुक्रमे कोविड कक्ष आणि आयसीयूमध्ये दाखल करण्याचं आयसीएमआरकडून सांगण्यात आलं आहे. 






देशातील कोरोना आकडेवारीचा आलेख काहीसा उतरता


देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये काही प्रमाणात घट झाली असली तरी अद्याप परिस्थिती चिंताजनक आहे. मागील 24 तासात देशात 2 लाख 81 हजार 386 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली असून तीन लाख 78 हजार 741 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. गेल्या 24 तासात देशात चार हजार 106 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केली आहे.    


भारतात आतापर्यंत 18 कोटी 29 लाख 26 हजार 460 लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. तर आतापर्यंत 31 कोटी 64 लाख 23 हजार 658 लोकांच्या कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.