पिनाकी चंद्र घोष देशाचे पहिले लोकपाल, राष्ट्रपतींकडून नियुक्ती
एबीपी माझा वेब टीम | 19 Mar 2019 11:07 PM (IST)
अखेर आज देशाला पहिले लोकपाल मिळाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष यांची लोकपालच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष भारताचे पहिले लोकपाल बनले आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घोष यांची नियुक्ती केली आहे. भारतात लोकपाल कायदा संमत झाल्यानंतर तब्बल पाच वर्षांनी देशाला पहिले लोकपाल मिळाले आहेत. लोकपालांची नियुक्ती करण्यासाठी एक विशेष निवड समिती बनवण्यात आली होती. या समितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन, सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि प्रसिद्ध विधिज्ज्ञ मुकुल रोहतगी यांचा समावेश आहे. तत्पूर्वी लोकपालच्या अध्यक्षपदासाठी 20 जणांचे अर्ज आले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखालील शोध समितीने त्यापैकी 10 जणांची निवड केली. त्यानंतर निवड समितीने या 10 जणांचा विचार करुन पी. सी. घोष यांची निवड केली आहे. घोष यांची सरन्यायाधीपदी नियुक्ती होण्यापूर्वी ते आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. त्याअगोदर ते कोलकाता उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम पाहत होते. घोष सध्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य आहेत. 2017 साली ते सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झाले आहेत. घोष यांचे वय 66 वर्ष इतके आहे. घोष यांचे वय 70 वर्ष होईपर्यंत ते लोकपालच्या अध्यक्षपदी कायम राहतील. म्हणजेच पुढील चार वर्ष घोष लोकपालचे अध्यक्ष असतील. लोकपालच्या अध्यक्षांना सरन्यायाधीशांइतकाच पगार आणि दर्जा असेल.