रत्नागिरी : रत्नागिरीमध्ये ठिकठिकाणी पेट्रोल आणि डिझेलचे साठे संपले आहेत. त्यामुळे पेट्रोल डिझेल विक्री पूर्णपणे बंद झाली आहे. पेट्रोलपंप मालकांचा बंद आणि पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी वाहनचालकांनी केलेली गर्दी यामुळे ही परिस्थिती उदभवली आहे.
पेट्रोल आणि डिझेलची खरेदी गुरुवारपासून बंद आहे. त्यामुळे वाहनचालकांनी आदल्या दिवसापासूनच इंधन भरुन घेण्यासाठी गर्दी केली होती. अखेर पेट्रोलपंप चालकांनी शनिवारपासून खरेदी पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
पेट्रोल डिझेलचे टँकर शहरात पोहचायला मात्र आणखी एक दिवस लागेल. त्यामुळे शनिवारी संध्याकाळपर्यंत शहरात पेट्रोल उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
देशातल्या ऑईल कंपन्यांच्या मनमानी कारभाराला विरोध करत देशभरातील पेट्रोलपंप चालकांकडून पेट्रोल-डिझेल खरेदी बंद करण्यात आली आहे. इंडियन पेट्रोल डिलर्स कॉन्फेडरेशनच्या आदेशानुसार हे राष्ट्रव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. 19 ऑक्टोबरपासून या आंदोलनाला सुरुवात झाली होती. मात्र, ऑईल कंपन्यांबरोबरच सरकारनंही त्याकडे दुर्लक्ष केल्यानं पेट्रोल-डिझेल खरेदी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती फामपेडाचे अध्यक्ष उदय लोध यांनी दिली.