चंदीगड : पेट्रोल पंप मालकांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमधील असमानता दूर करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी देशभरात ‘एक देश, एक दर’ लागू करण्याची मागणी केली आहे.
ऑल इंडिया पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजय बन्सल यांनी मागणी करताना म्हटलं, “आम्ही इंधनांसाठी ‘एक देश, एक दर’ लागू करण्याची मागणी करत आहोत. जेणेकरुन राज्या-राज्यांमधील पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमधील तफावत दूर होईल.”
राज्या राज्यांमध्ये इंधनांच्या किंमतीत तफावत किती आहे?
राज्या-राज्यांमधील कमी-अधिक व्हॅटनुसार पेट्रोल-डिझेलच्या किंमतीही बदलतात. ईंधनांमधील किंमतींमधील ही तफावत मोठी आहे. यामध्ये डिझेलच्या किंमती 60 पैसे ते 4 रुपये प्रति लिटर, तर पेट्रोलच्या किंमती 1 रुपया ते 7.50 रुपये प्रति लिटर फरकाने आढळतात.
कुठल्या राज्यात सर्वात महाग इंधन आणि स्वस्त इंधन?
पेट्रोलवर आजच्या घडीला तामिळनाडू राज्यात सर्वाधिक कर म्हणजेच 35 टक्के कर लागू आहे, तर गोव्यात सर्वात कमी कर लागू आहे. त्यामुळे तेथील किंमतीही त्या प्रमाणे आहेत. त्याचवेळी डिझेलवर सर्वाधिक कर हरियणा राज्यात आहे, तर सर्वात कमी कर राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्ये आहे.
दरम्यान, ऑल इंडिया पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजय बन्सल यांच्या ‘एक देश, एक दर’ या संकल्पना किती राज्यांना परवडणारी आहे आणि किती राज्या या संकल्पनेला समर्थन देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.