मुंबई: पेट्रोल-डिझेलच्या रोजच्या दरबदलामुळे वाहनचालकांना मनस्तापाचा सामना करावा लागत आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून तर पेट्रोल-डिझेलचे दर वाढतच आहेत. त्यातच पेट्रोल-डिझेल जीएसटीतून वगळण्यात आल्याने,त्यावरील व्हॅट कायम आहे.


जुलै 2017 पासून पेट्रोल-डिझेलचे दर दररोज बदलत आहेत. तेव्हापासून ते आजपर्यंत पेट्रोलच्या दरात वाढच होताना दिसत आहे. वेगवेगळ्या शहरात वेगवेगळे दर आहेत.

मुंबईत 1 जुलै 2017 रोजी पेट्रोलचा दर 74.30 रुपये लिटर होता. दररोजच्या दरबदलामुळे त्यामध्ये चढउतार सुरुच आहे. आज 11 सप्टेंबरला हा दर 79.28 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच यामध्ये 5 रुपयांची वाढ झाली आहे.

दिल्लीत 1 जुलै 2017 ला पेट्रोलचा दर 63.09 रुपये होता. तो आज 70.17 रुपये आहे.

कधीकाळी एक -दोन रुपये जरी पेट्रोल वाढले, तरी वाहनचालकांच्या असंतोषाला कंठ फुटायचा. आता तर अडीच महिन्यात पेट्रोलने 5 रुपयांची उसळी घेतली आहे. तरीही सगळे चिडीचूप आहेत. त्यामागे रोजच्या रोज बदलणारे पेट्रोलचे दर कारणीभूत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणांमध्येही कायम इंधनाचा मुद्दा असायचा. पण सत्ता आली आणि इंधन हा सत्ताधाऱ्यांसाठी मुद्दा राहिलेला नाही. त्यामुळे लोकांना आता पेट्रोलच्या आगीतून फुफाट्यात पडल्यासारखं वाटत आहे.