Petrol-Diesel Price Hike : देशात दिवसागणित इंधनदरवाढीचं सत्र सुरुच आहे. सध्या पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी देशात आतापर्यंतचा उच्चांक घातला आहे. आज देशात पेट्रोल 25 पैशांनी आणि डिझेल 30 पैशांनी महाग झालं आहे. यापूर्वी मंगळवारी पेट्रोल 22 पैसे आणि डिझेल 75 पैशांनी महाग झालं होतं. 

सरकारी तेल कंपन्यांनी आजचे दर जाहीर केले आहेत. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने (IOCL) दिलेल्या माहितीनुसार, देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत 25 पैशांनी वाढून 101.64 रुपये आणि डिझेल 30 पैशांनी वाढून 89.87 रुपये प्रति लीटरवर पोहोचलं आहे. अशातच मुंबईत पेट्रोल 107.71 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर 97.52 रुपये प्रति लिटर इतके झाले आहेत. 

देशातील महत्त्वाच्या शहरांमधील दर : 

देशातील महत्त्वाची शहरं पेट्रोल रुपये/लिटर डिझेल रुपये/लिटर
दिल्ली  101.64 89.87
मुंबई  107.71 97.52
कोलकाता  102.17 92.97
चेन्नई  99.36 94.45

इंडियन ऑईलनं जारी केलेल्या तेलाच्या किमतींनुसार, देशातील चार महानगरांची तुलना केली तर इतर शहरांच्या तुलनेत मुंबईत पेट्रोल-डिझेल सर्वाधिक किमतीत विकलं जात आहे. दरम्यान, राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर केंद्र आणि राज्य सरकार यांनी आकारलेला कर आणि वाहतूक खर्च यांमुळे पेट्रोल-डिझेलच्या किमती वेगवेगळ्या असतात. 

पेट्रोल-डिझेल GSTमध्ये घेण्यासाठी का तयार नाही केंद्र आणि राज्य सरकार?

केंद्र सरकारनं कर प्रणालीमध्ये सुधारणांची गरज असल्याचं कारण देत जीएसटी (GST) लागू केला होता. पण जीएसटीमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा समावेश करण्यात आलेला नाही. तसेच देशातील बहुतांश राज्य सरकारचंही हेच मत आहे की, पेट्रोल-डिझेलचा जीएसटीच्या कक्षेत समावेश केला जाऊ नये. पण का?  यामुळे काय फायदा होणार? यांसारखे अनेक प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झाले आहेत. जाणून घेऊया यामागील कारणं... 

पेट्रोल-डिझेलच्या किमती जीएसटीच्या कक्षेत आणण्याची केंद्र सरकारसोबत राज्य सरकारचीही इच्छा नाही. कारण सरकारला चिंता आहे ती, देशाच्या तिजोरीची. सामान्य माणसाला दिलासा देता-देतो, देशाच्याच तिजोरीत खडखडाट होण्याची भिती सरकारला वाटतेय. जर पेट्रोल-डिझेलचा समावेश जीएसटीच्या कक्षेत केला, तर पेट्रोल-डिझेलच्या किमती अर्ध्या होणार. आजच्या किमतीनुसार जर अंदाज लावला तर, पेट्रोल 56 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 55 रुपये प्रति लिटर विकलं जाईल. 

पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).