नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कपात होईल, असा अंदाज लावला जात होता. मात्र पेट्रोल, डिझेलचे दर वाढण्याची शक्यता आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर दुप्पटीने वाढले आहेत.

'इकॉनॉमिक टाईम्स'च्या वृत्तानुसार पेट्रोल, डिझेलच्या दरात 3 ते 6 रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते. जानेवारी 2015 मध्ये कच्च्या तेलाचे दर 27.88 प्रति डॉलर एवढे होते. हेच दर आता 55 डॉलरपर्यंत पोहचले आहेत.

कच्च्या तेलाची निर्मिती करणाऱ्या देशांची संघटना 'ओपेक'ने पुढच्या महिन्यापासून कच्च्या तेलाची निर्मिती घटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गेल्या पाच दिवसात कच्च्या तेलाचे दर जवळपास 18 टक्क्यांनी वाढले आहेत. परिणामी भारतासह कच्च्या तेलाची आयात करणाऱ्या देशांमध्ये पेट्रोल, डिझेलचे दर वाढू शकतात.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्याचा परिणाम भारतातील तेल कंपन्यांवरही होणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्याने भारतीय तेल कंपन्यांनाही इंधन दर वाढवावे लागतील. तर डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला असल्याने ग्राहकांना आणखी झळ सोसावी लागणार आहे.

तेल कंपन्यांची दर वाढवण्याबाबत आज महत्वपूर्ण बैठक पार पडली असून दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पेट्रोल, डिझेलचे दर जास्तीत जास्त 3 रुपयांपर्यंत वाढू शकतात. यापूर्वी 30 नोव्हेंबर रोजी पेट्रोलच्या किंमतीत 13 पैशांनी वाढ करण्यात आली होती. तर डिझेलचे दर 14 पैशांनी स्वस्त करण्यात आले होते.