नवी दिल्ली : नोटाबंदीमुळे आधीच देशभरात लोकांचं दैनंदिन व्यवहार कोलमडल्याने गोंधळाची स्थिती आहे. या सर्व गोंधळात काहीसा दिलासा देणारी बातमी आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे.
पेट्रोलचे दर प्रति लीटर 1 रुपया 46 पैशांनी, तर डिझेल प्रति लीटर 1 रुपया 53 पैशांनी स्वस्त झाला आहे. मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार आहेत.
अगदी आठवडाभरापूर्वीच म्हणजे 5 नोव्हेंबरला पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली होती. त्यामुळे अवघ्या दहा दिवसांच्या आतच दर कमी झाले आहेत. सप्टेंबर महिन्यापासून पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत जात होते. ऑक्टोबरमध्ये दोन वेळा, तर सप्टेंबरमध्येही 16 तारखेला पेट्रोल-डिझेलचे दर वाढले होते.
कच्च्या तेलातील चढ-उताराच्या आधारावर घरगुती ऑईल मार्केटिंग कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्वस्त-महाग करत असतात.