नवी दिल्ली : भारतीय बाजारात डिझेलच्या दरात वाढ सुरुच आहे. आज (27 जून) सलग 21 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. दिल्लीत आज पेट्रोल 25 पैसे आणि डिझेल 21 पैसे महागलं आहे. मागील 21 दिवसात डिझेल 11 रुपये आणि पेट्रोल 9.12 रुपयांनी महागलं आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोल 80.38 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 80.40 रुपयांवर पोहोचलं आहे. मागील तीन दिवसांपासून दिल्लीमध्ये डिझेलचा दर पेट्रोलपेक्षा जास्त आहे.


21 दिवसात डिझेल 11 रुपये, पेट्रोल 9.12 रुपयांनी महागलं
आंतरराष्ट्रीय बाजारात मागील 21 दिवसांपैकी बरेच दिवस क्रूड ऑईलचे दर सामान्यच राहिले आहेत. पण भारतीय बाजारात याचे दर सतत वाढत आहेत. सध्या कच्च्या तेलाची किंमत 40 डॉलर प्रति बॅरलच्या जवळपास आहे. पण पेट्रोल-डिझेलच्या किमतीत त्या हिशेबाने कमी झालेल्या नाहीत. त्याचाच परिणाम म्हणून मागील 21 दिवसात डिझेल 11 रुपये, पेट्रोल 9.12 रुपयांनी महागलं आहे.

यामुळं वाढत आहेत पेट्रोल-डिझेलचे दर
देशात कोरोनामुळं जवळपास अडीचे महिने लॉकडाऊन होता. यामुळं सरकारी तिजोरीवर चांगलाच भार आला. यानंतर सरकारकडे महसूल वाढवण्यासाठी पेट्रोल आणि डिझेल हेच एकमेव चांगले सोर्स आहेत. जीएसटी आणि डायरेक्ट टॅक्स कलेक्शनमध्ये कोरोना लॉकडाऊनमुळं खूप कमी झाली आहे. एप्रिल महिन्यात सेंट्रल जीएसटी कलेक्शन केवळ 6,000 कोटी रुपयांचं होतं तर एका वर्षापूर्वी या काळात सीजीएसटी कलेक्शन 47,000 कोटी इतकं होतं. यामुळं महसूलवाढीसाठी सरकार सतत पेट्रोल-डिझेलचे भाव वाढवत आहे.

पेट्रोलच्या तुलनेत डिझेल असं वधारलं!
दिल्लीमध्ये इंधनावर लागणारा कर एप्रिल महिन्यापर्यंत देशात सर्वात कमी होता तर मुंबईत सर्वाधिक होता. दिल्ली सरकारने 4 मे रोजी डिझेलवरील व्हॅट 16.75 टक्क्यांनी वाढवून 30 केल्यानंतर दिल्लीमध्ये डिझेलची किंमत मुंबईपेक्षाही वाढली आहे. पेट्रोलवरचा व्हॅटही वाढवला, आधी 27 टक्के असलेला व्हॅट आता 30 टक्के करण्यात आला.

दिल्ली वगळता इतर राज्यांमध्ये  पेट्रोलच्या तुलनेत डिझेल स्वस्त
डिझेल आणि पेट्रोलच्या किमतीत अंतर असण्याचं कारण म्हणजे राज्य आणि केंद्र सरकार पेट्रोलच्या तुलनेत डिझेलवर कमी कर आकारतं. पण ऑक्टोबर 2014 मध्ये इंधन दरावरील सरकारचं नियंत्रण हटल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील अंतर फारच कमी होत गेलं. आता दिल्लीत तर अशी परिस्थिती आहे की, डिझेलचे दर पेट्रोलपेक्षा जास्त आहे. मात्र महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये डिझेल पेट्रोलपेक्षा स्वस्त आहे. खरंतर दिल्लीमध्ये पेट्रोलवर 64 टक्के कर आकारला जातो आणि डिझेलवर 63 टक्के कर आहे. कर समान असल्याने त्यांच्या दरातील अंतर जवळपास संपलं आहे.

कोणत्या शहरात किती आहे पेट्रोल-डिझेलचा भाव

शहर पेट्रोल (प्रति लिटर) डीजल (प्रति लिटर)

दिल्ली 80.38 रुपये 80.40 रुपये

मुंबई 87.14 रुपये 78.71 रुपये

लखनौ 80.94 रुपये 72.37 रुपये

पाटणा 83.27 रुपये 77.30 रुपये

कोलकाता 82.05 रुपये 75.42 रुपये

नोयडा 81.04 रुपये 72.48 रुपये