नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे कोरोना संकटातच नागरिकांना महागाईचे चटके सोसावे लागत आहेत. इतकंच नाही तर ट्रॅक्टर, ट्रकसह अनेक आवश्यक सेवांसाठी वापरल्या जाणाऱ्या डिझेलच्या दरातही ऐतिहासिक वाढ झाली आहे. आज (23 जून) सलग सतराव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती पुन्हा एकदा वाढल्या आहेत. पेट्रोलचे दर 20 पैशांनी वधारले आहेत तर डिझेलमध्ये 55 पैशांनी वाढ झाली आहे. यासोबत राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल प्रति लिटर 79.76 रुपयांवर पोहोचलं असून डिझेलचा प्रति लिटर दर 79.40 पैसे आहे. म्हणजेच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत आता फक्त 36 पैशांचाच फरक राहिला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील अंतर एवढं कमी होण्याची इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे.


मुंबईतील आजचा (23 जून) पेट्रोलचा दर 86.54 रुपये असून डिझेल 77.76 रुपये आहेत. मुंबईतही पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील अंतर जवळपास नऊ रुपये आहे.


मागील काही वर्षांची तुलना केल्यास, 2012 पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सुमारे 30 रुपयांचा फरक होता. याआधी पेट्रोल आणि डिझेलमध्ये किंमतीमध्ये अंतर कायम होतं. पण आंतरराष्ट्रीय बाजाराशी इंधनाचे दर जोडल्यानंतर हा फरक संपुष्टात आला. याशिवाय केंद्र आणि राज्य सरकारच्या करांमध्येही वाढ झाली आहे. डिझेलचा वापर मोठ्या वाहनांची वाहतूक आणि शेतकऱ्यांकडून जास्त केला जातो. हे लक्षात घेऊन यावर कमी कर लावला जातो, जेणेकरुन किंमती कमी राहतील.


ऑक्टोबर 2014 मध्ये इंधनाच्या किंमतीवरील सरकारी नियंत्रण हटलं आणि दर आंतरराष्ट्रीय बाजाराशी जोडल्यानंतर ही परिस्थिती निर्माण झाली. दिल्लीबाबत बोलायचं झाल्यास पेट्रोल आणि डिझेलवर लागणारा कर जवळपास समान आहे. पेट्रोलवर 64 टक्के तर डिझेलवर 63 टक्के कर आकारला जात आहे. मात्र आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील अंतर नऊ ते दहा रुपये आहे. याचं कारण म्हणजे महाराष्ट्र सरकारकडून डिझेलवर कमी कर आकारला जातो.


दरम्यान, 4 मे रोजी दिल्ली सरकारने डिझेलवरील वॅट 16.75 टक्क्यांनी वाढवून 30 टक्के केला होता. यामुळे डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली होती. मुंबईशी तुलना केल्यास दिल्लीत पेट्रोल स्वस्त आहे पण डिझेल महागलं आहे.


सरकारने इंधन दरवाढ करुन जनतेच्या जखमांवर मीठ चोळलं
सलग 17 दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवून सरकारने निर्दयीपणे जनतेच्या जखमांवर मीठ चोळले आहे, अशी टीका काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली. काँग्रेस कार्यकारिणीच्या आज झालेल्या बैठकीत त्यांनी सरकरावर निशाणा साधला. त्याआधी भारत-चीन सीमेवर शहीद झालेल्या जवानांना दोन मिनिटे श्रद्धांजली वाहून काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीला सुरुवात झाली.