नवी दिल्ली : सीबीएसई 12 वीची बोर्ड परीक्षा रद्द करावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. यावर्षी बारावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल वस्तुनिष्ठ पध्दतीच्या लॉजिकनुसार जाहीर करण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे. सीबीएसई (केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ) इयत्ता 12 वीची परीक्षा 4 मे ते 14 जून दरम्यान घेण्यात येणार होती. मात्र, कोविड 19 च्या साथीच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.


सीबीएसई परीक्षा रद्द करण्याच्या बातम्यांचं बोर्डाकडून खंडन
दुसरीकडे, सीबीएसईने शुक्रवारी बारावीच्या परीक्षांबाबतच्या माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यांचे खंडन केलं आहे. ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की बोर्ड बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची शक्यता आहे. इयत्ता 12 वीच्या परीक्षेसंबंधीच्या माध्यमांच्या वृत्तांना उत्तर देताना सीबीएसईने म्हटले आहे की, "सीबीएसईने बारावीच्या परीक्षांसंदर्भात असे कोणतेही निर्णय घेतले नसल्याचे स्पष्ट केल जात आहे. जर असा निर्णय झाला तर अधिकृतपणे जाहीर करण्यात येईल. यापूर्वी शिक्षण मंत्रालयाने असे सांगितले होते की 1 जून रोजी महामारीचा सद्यस्थितीचा आढावा घेतल्यानंतर ते बारावीच्या बोर्ड परीक्षेबाबत चर्चा करतील.


परीक्षा सुरू होण्यापूर्वी 15 दिवसांची नोटीस दिली जाईल
शिक्षण मंत्रालयाच्या (MoE) अधिकाऱ्याने सांगितले की, “4 मे ते 14 जून या कालावधीत होणाऱ्या 12 वीच्या बोर्ड परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. या परीक्षा नंतर घेतल्या जातील. 1 जून रोजी मंडळामार्फत परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल आणि नंतर तपशील जाहीर केला जाईल. परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान 15 दिवसांची नोटीस दिली जाईल."


विद्यार्थांकडून परीक्षा रद्द करण्याची मागणी
यापूर्वी CBSE इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांनी कोरोना संसर्गाची वाढती प्रकरणे लक्षात घेत बोर्ड परीक्षा रद्द करण्याची विनंती करत हॅशटॅग #saveboardstudents या नावाने ऑनलाईन मोहीम सुरू केली होती. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांनी Change.org वर एक याचिका देखील दाखल केली आहे, ज्यामध्ये सरकारकडे 12 वी वर्ग बोर्डाची परीक्षा रद्द करण्याची मागणी केलीय.