मुंबई : 'पेप्सिको'च्या पहिल्या महिला अध्यक्षा आणि सीईओ इंद्रा नूयी पदावरुन पायउतार होत आहेत. तब्बल 12 वर्षांनंतर इंद्रा नूयी अध्यक्षपद सोडणार आहेत.

3 ऑक्टोबर 2018 रोजी नूयी आपल्या पदाची सूत्रं ग्लोबल ऑपरेशन्सचे प्रमुख रेमन लॅगार्ता यांच्याकडे सुपूर्द करतील. गेल्या 24 वर्षांपासून त्या 'पेप्सी'मध्ये कार्यरत आहेत. अध्यक्षपद सोडल्यानंतरही त्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सच्या प्रमुख म्हणून काम पाहतील.

62 वर्षीय इंद्रा नूयी यांना उद्योगविश्वात मोठा मान आहे. त्यांनी 'पेप्सी' या ब्रँडची ख्याती जगभरात पसरवली. जगातल्या सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत फॉर्च्युन मॅगझिननं त्यांचा सातत्यानं समावेश केला आहे.

पेप्सिकोच्या अध्यक्ष आणि सीईओ या नात्यानं त्यांच्यावर फूड अँड बेव्हरेज विभागाची जागतिक जबाबदारी होती. त्यामध्ये 22 ब्रँड्सचा समावेश असून प्रत्येक ब्रँडच्या उद्योगात वर्षाला अंदाजे एक अब्ज डॉलर्सची उलाढाल होत असते.

जून महिन्यात इंद्रा नूयी यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल (आयसीसी) च्या पहिल्या संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आयसीसीच्या संचालकपदाचा स्वतंत्र कार्यभार एका महिलेच्या हाती सोपवण्याचा निर्णय आयसीसी कौन्सिलनं गेल्या वर्षी घेतला होता.