मुंबई : त्रियुगी नारायण मंदिर... इथे शिव आणि पार्वतीचा विवाह सोहळा झाल्याची आख्यायिका आहे. त्यामुळे इथे झालेली लग्नं सात जन्म टिकतात, अशी भक्तांची धारणा आहे. हिमालयाच्या गिरीशिखरांमध्ये वसलेल्या त्याच रुद्रप्रयागमधल्या त्रियुगी नारायण मंदिरात होणार आहे आशियातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या मोठ्या मुलाचं लग्न.


मुकेश अंबानी यांचे सुपुत्र आकाश अंबानी आणि श्लोका मेहता याच मंदिरामध्ये लग्नगाठ बांधणार आहेत. पण प्रश्न असा आहे, की आशिया खंडातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या मुलाचं लग्न अशा कडेकपारीतल्या छोट्याशा गावातल्या एका लहानशा मंदिरात का होत आहे?

खरं तर अंबानी यांच्या मुलाचं लग्न एखाद्या प्रायव्हेट बीचवर किंवा एखाद्या प्रायव्हेट हिल स्टेशनवरही करता आलं असतं. देशातलंच काय, परदेशातलं सर्वात महागडं हॉटेलही अंबानी सहज बुक करु शकतात. पण तसं न करता अंबानी यांनी हेच मंदिर का निवडलं?

अनंत अंबानी आणि राधिकाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

हिंदू मान्यतेनुसार, त्रियुगी नारायण मंदिराच्या जवळच असलेल्या गौरीकुंडामध्ये तपश्चर्या करुन पार्वतीनं भगवान शंकरांना प्रसन्न केलं होतं. त्यानंतर या दोघांचा विवाहसोहळा याच त्रियुगी नारायण मंदिरात पार पडला. या मंदिरात असलेला अग्नी हा तीन युगांपासून विझलेला नाही.

त्रेता युग, द्वापार युग आणि कलियुगातही हा अग्नी अखंड तेवत आहे, असं मानलं जातं. याच अग्नीला साक्षी मानून शंकर आणि पार्वती लग्नबंधनात अडकले. या लग्नात पार्वतीचे बंधू म्हणून भगवान नारायण यांनी व्यवस्था पाहिली, तर भगवान ब्रह्मांनी या लग्नाचं पौरोहित्य केल्याचीही आख्यायिका आहे. इथे लग्न करणाऱ्या दाम्पत्याचं लग्न हे यशस्वी होतं, अशीही धारणा आहे.

हिरे व्यापारी रसेल मेहता यांची मुलगी श्लोका मेहतासोबत जुलै महिन्यात आकाशचा साखरपुडा झाला होता. या सोहळ्याला राजकारणी, उद्योगपती, क्रिकेट स्टार्स तसेच ख्यातनाम बॉलिवूड दिग्गजांनी हजेरी लावली.

उत्तराखंड सरकारनेही या मंदिराला वेडिंग डेस्टिनेशनचा दर्जा दिला आहे. आतापर्यंत अभिनेत्री कविता कौशिक, उत्तराखंडचे माजी मंत्री धनसिंह रावत आणि आयएएस अपर्णा रावत यांचीही लग्नं इथेच झाली आहेत. मुळात हे वेडिंग डेस्टिनेशन अत्यंत छोटं असल्यानं या लग्नात अगदी मोजक्याच पाहुण्यांना आमंत्रित केलं जाणार आहे.

अंबानींसारख्या उद्योगपतीच्या मुलाचं लग्न आपल्या राज्यात होत असल्यानं उत्तराखंड सरकारचीही धांदल उडाली आहे.
समुद्रसपाटीपासून 9 हजार फूट उंचीवर होणारा हा विवाहसोहळा, तितक्याच उंचीचा ठरेल यात शंका नाही.