चंदीगड : नोटाबंदीमुळे लोक नाराज आहेत, असं म्हणत भाजपच्या चंदीगड येथील खासदार किरण खेर यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. लोक नाराज आहेत, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वांनी साथ दिली पाहिजे, असं किरण खेर यांनी म्हटलं आहे.
चंदीगड येथील एका निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर किरण खेर यांनी आपलं मत व्यक्त केलं. मात्र निवडणुकीत यश न मिळाल्यास अपयशाचं खापर नोटाबंदीवर फोडून आपला बचाव करण्याचा मार्ग किरण खेर यांनी निकालाआधीच अवलंबल्याचं दिसत आहे.
किरण खेर सिनेमा कारकीर्दीनंतर मोदी लाटेत चंदीगडमधून पहिल्यांदाच निवडणूक लढवून विजयी झाल्या. स्थानिक निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. मात्र नोटाबंदीने लोक नाराज आहेत, असं सांगत पराभव झाला तरी त्याचं खापर नोटाबंदीवर फोडण्याचा मार्ग अवलंबला असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान पंजाबमधील भाजपचे घटक पक्षाचे अकाली दलचे अध्यक्ष सुखबीर बादल यांनी देखील नोटाबंदीचं समर्थन केलं होतं. नागरिकांना त्रास होत आहे. मात्र थोडा संयम राखणं गरजेचं आहे, असं त्यांनी म्हटलं होतं.