Air Travel : हवाई प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. कोविड (Covid 19) कालावधीत हवाई तिकीटांचे (Air Tickets) अडकलेले पैसे परत (Refund ) मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जर तुम्ही कोविड-19 महामारी (Coronavirus) दरम्यान लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन कालावधीत (Lockdown) विमानाचे तिकीट बुक केले असेल, पण रद्द केलेल्या तिकीटाचे पैसे तुम्हाला आजपर्यंत परत मिळाले नसतील तर, त्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. तुम्हाला तुमचे अडकलेले पैसे लवकरच परत मिळणार आहेत. केंद्र सरकारने ट्रॅव्हल पोर्टलला यासंदर्भात नोटीस जारी केली आहे. देशात लॉकडाऊन काळात अनेक नियोजित उड्डाणे रद्द झाल्यामुळे अनेक प्रवाशांना प्रवास करता आला नाही, शिवाय त्यांचे पैसेही अडकले होते. 


लॉकडाऊनमधील विमान तिकीटांचे अडकलेले पैसे लवकरच मिळणार


कोविड-19 महामारीमुळे लॉकडाऊनमुळे अनेक नियोजित व्यावसायिक उड्डाण सेवा ठराविक कालावधीसाठी रद्द करण्यात आली होती. ग्राहक व्यवहार मंत्रालयाने नुकतीच ऑनलाइन ट्रॅव्हल एग्रीगेटर्ससोबत एक बैठक घेतली आहे. सरकारने ऑनलाइन ट्रॅव्हल एग्रीगेटर्सना पुढील आठवड्यापर्यंत प्रवाशांना त्यांच्या कोविड काळातील रद्द झालेल्या फ्लाइट तिकिटांचे पैसे परत करण्याचे निर्देश दिले आहेत. 25 मार्च 2020 पासून सुरू झालेल्या कोविड-19 महामारीमुळे देशात लॉकडाऊन लागू करण्यात आलं होतं. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अनेक नियोजित फ्लाईट्स ठराविक कालावधीसाठी स्थगित आल्या, ज्यामुळे अनेक प्रवाशांना प्रवास करता आला नाही.