दिल्ली : काश्मीरमधील पेलेट गनच्या वापरावर आम्ही बंदी घालण्याचा आदेश देतो, मात्र स्थानिकांकडून होणारी दगडफेक थांबेल असा विश्वास देऊ शकता का? असा सवाल सुप्रीम कोर्टानं काश्मीर बार असोसिएशनला दिला आहे. काश्मीरच्या बार असोसिएशननं पेलेट गनच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी केली होती.
काश्मीरमधील पेलेट गनच्या वापराविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेची सुनावणी मुख्य न्यायमुर्ती जे एस खेहर यांच्या खंडपीठासमोर झाली. यावेळी खंडपीठानं दगडफेक आणि स्थानिकांकडून होणाऱ्या उपद्रवावर सकारात्मक तोडगा कसा काढता येईल असा सवालही उपस्थित केला आहे. तसंच याचिकाकर्त्यांना सर्प पक्षांशी बातचित करुन परिस्थिती कशी नियंत्रणात आणता येईल याचा विचार करण्यास सांगितलं आहे.
“काश्मीरमध्ये परिस्थिती वारंवार बिघडत चालली आहे. यासंबंधी राजकीय पक्षांशी चर्चा होऊ शकते. मात्र स्वातंत्र्य मागणाऱ्या फुटीरतावाद्यांशी कोणतीच चर्चा होऊ शकत नाही” असं सुनावणीदरम्यान अटॉर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी सांगितलं आहे.
याप्रकरणी पुढील सुनावणी 9 मे रोजी होणार आहे.