नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि त्यांची पत्नी पायल अब्दुल्ला यांच्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत. दिल्लीच्या कनिष्ठ न्यायालयात ओमर अब्दुलांनी घटस्फोट देण्यास नकार दिल्यानंतर पायल अब्दुल्लांनी कोर्टात याचिका दाखल करून दरमहा 15 लाख भत्ता देण्याची मागणी केली आहे.


 

पायल अब्दुल्ला यांनी यासंबंधातील अधिक माहिती देताना सांगितले की, ''ओमर अब्दुल्ला यांनी जबाबदारीतून हात झटकले आहेत. त्यांनी गेल्या तीन वर्षांपासून कोणताही खर्च दिलेला नाही. त्यामुळे मला अडचणींचा सामना करावा लागत आहे.''

 

''मी अजूनही ओमर अब्दुल्लांची पत्नी आहे. आमचा अजूनही घटस्फोट झाला नाही. पण माझ्याजवळ मुलांचे पालनपोषण करण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे ओमर यांनी आपली जबाबदारी पूर्ण करावी, अन् मुलांच्या पालनपोषणाचा खर्च द्यावा.''

 

पायल खोटं बोलत आहे: उमरचे वकील

दरम्यान, पायल अब्दुल्लांच्या अरोपांवर ओमर अब्दुल्ला यांचे वकील मालविका राजकोटीया यांनी प्रतिक्रीया देताना पायल खोटं बोलत असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, ''पायल खोटं बोलत असून, त्यांना खर्च मिळत नव्हता, तर गेल्या 3 वर्षांपासून ती शांत का होत्या. वास्तविक, ओमर अब्दुल्ला घर खर्च आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च वेळोवेळी देतात.''

 

दरम्यान, पायल अब्दुल्लाच्या याचिकेवर ओमर अब्दुल्ला यांना न्यायालयाने नोटीस बजावली असून 27 ऑक्टोबरपर्यंत उत्तर देण्याच्या सूचना दिल्या आहेत.