Bihar Pandav Gang : बिहारची राजधानी पाटणा येथे मंगळवारी भाजपचे माजी आमदार चित्तरंजन शर्मा (Chittaranjan Sharma) यांचे भाऊ शंभू शर्मा आणि गौतम शर्मा यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. अवघ्या 35 दिवसांत माजी आमदार चित्तरंजन शर्मा यांच्या चार नातेवाईकांना जीव गमवावा लागला आहे. 26 एप्रिल रोजी चित्तरंजन यांचे काका अभिराम शर्मा यांची जहानाबादमध्ये आणि पुतण्या दिनेश शर्मा यांची मसौधीमध्ये हत्या करण्यात आली होती.
या घटनेत नीमा येथील पांडव टोळीचा मुख्य सूत्रधार संजय सिंह याचा हात असल्याचं बोललं जात आहे. 


चार दिवसांपूर्वी संजय सिंह यांचा जवळचा सहकारी सुधीर शर्मा याची धनरुआ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेदम मारहाण करत हत्या करण्यात आली होती. मात्र, या प्रकरणात माजी आमदार किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचं नाव आलं नाही. याचा सूड घेण्यासाठी माजी आमदाराच्या दोन्ही भावांची हत्या करण्यात आली. पोलीस अधीक्षक डॉ. मानवजीत सिंह ढिल्लन यांनी सांगितलं की, नीमा गावात वर्चस्वासाठी दोन गटांमध्ये गँगवॉर सुरू आहे. यामध्ये हत्येची प्रकरण समोर येत आहेत. या हत्येमागे प्रथमदर्शनी संजय सिंहचा हात असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या आरोपांचा शोध सुरू आहे.


माजी आमदार चित्तरंजन शर्मा यांना पाच भाऊ आहेत. भावांमध्ये मृत शंभू शरण हा चौथा आणि गौतम पाचवा होता. आगमकुआन पोलीस स्टेशन हद्दीतील विजयनगरमधील देशरत्न पथ इथं त्यांचं घर आहे. शंभू हा चार्टर्ड अकाउंटंट होता. दिल्लीत शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो तिथेच सराव करत होता. पण लॉकडाऊनच्या काळात तो पाटण्याला आला. सध्या पीसी कॉलनीतील महेंद्रलोक अपार्टमेंटमध्ये त्यांचं कार्यालय आहे. यामध्ये गौतमनंही त्याला मदत केली होती.


नीमा गावातील पाच मित्रांची पांडव गँग


1995 च्या सुमारास पाटणा जिल्ह्यातील धनरुआ पोलीस ठाण्याच्या नीमा गावातील चित्तरंजन, बबलू, संजय सिंह, अशोक आणि विपिन या पाच मित्रांनी मिळून पांडव गँग बनवली. त्यांनी जहानाबाद, पाटणासह अनेक जिल्हे खंडणी, खून, अपहरण अशा अनेक गुन्हे केले. जहानाबादमध्ये सुमारे डझनभर हत्या करण्यात आल्या. नंतर टोळी फुटली आणि चित्तरंजन आणि संजय वेगळे झाले.


महत्त्वाच्या इतर बातम्या