पाटणा : पाटण्यातल्या गंगा नदीमध्ये बोट उलटून झालेल्या अपघातातील मृतांचा आकडा 24 वर पोहचला आहे. अनेक प्रवासी अद्यापही बेपत्ता आहेत. अपघाताप्रकरणी बोट ऑपरेटर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गंगा नदीवर असलेल्या एनआयटी घाटावर शनिवारी ही दुर्घटना घडली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त बोटीमध्ये 40 ते 50 प्रवासी होते. जिल्हा प्रशासनानं आयोजित केलेला पतंग महोत्सव आटपून सर्व जण बोटीनं घरी निघाले होते. मात्र बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी चढल्यानं ही दुर्घटना घडली.
बोट ऑपरेटरसोबतच अॅम्युझमेंट पार्कच्या मालकाविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनापरवाना सुरु असलेल्या अम्युझमेंट पार्कवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
दरम्यान बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मृतांच्या नातेवाईकांना 4 लाखांची मदत जाहीर केली आहे, तर पंतप्रधानांच्या कार्यालयाकडून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर झाली आहे.