Patiala Violence :  पंजाबमधील पतियाळा हिंसाचार प्रकरणी शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेल्या हरीश सिंगला याला पटियाळा पोलिसांनी अटक केली आहे. पटियाळा प्रकरणात शिवसेनेने पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या कारणावरून सिंग याची हकालपट्टी केली होती. 


पंजाबमधील पटियाळा येथे शुक्रवारी 'खलिस्तानविरोधी मोर्चा'वरून दोन गटांमध्ये झालेल्या दगडफेकीत दोन जण जखमी झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. शिवसेनेच्या खलिस्तान विरोधी मोर्चादरम्यान हिंसाचार उसळल्यानंतर त्याची गंभीर दखल मुख्यमंत्री भगवंत मान यांनी घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरिय बैठक घेत दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. 


या घटनेनंतर मुख्यमंत्री मान यांनी एक ट्विट केले आहे.  मान यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, पटियाळा येथील हिंसाचाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या (डीजीपी) संपर्कात असून त्यांच्यासोबत बोलणे झाले आहे. सध्या परिसरात शांतता प्रस्थापित झाली आहे. याबरोबरच पटियाळा येथील घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून डीजीपी आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली असून या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.






पंजाबमधील पटियाळा येथील हिंसाचाराच्या घटनेची दखल घेत राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाने शुक्रवारी राज्य सरकारकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. आयोगाने राज्याचे मुख्य सचिव अनिरुद्ध तिवारी यांना लिहिलेल्या पत्रात राज्य सरकारने सात दिवसांत अहवाल द्यावा, असे म्हटले आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील परिस्थिती चिघळू नये म्हणून मंदिराचे दरवाजे बंद करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दगडफेकीत एका पोलिसासह दोन जण जखमी झाले आहेत. शिवसेनेच्या एका नेत्याने सांगितले की, 29 एप्रिल रोजी 'खलिस्तानच्या स्थापना दिना' रोजी 'शिख्स फॉर जस्टिस'च्या घोषणेला प्रतिसाद म्हणून संघटनेने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.  


दरम्यान, सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. परंतु, दोन्ही बाजुच्या कार्यकर्त्यांमधील आक्रमकता पाहून बाहेरून पोलीस दल बोलावले आहे. या घटनेनंतर शांतता समितीची बैठक बोलावण्यात आली आहे. प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्याला प्राधान्य असल्याचे पटियाळा येथील पोलीस महानिरीक्षक राकेश अग्रवाल यांनी सांगितले. पटियाळा येथील हिंसाचारानंतर शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सायंकाळी सात ते सकाळी सहा वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे.