हरिद्वार : योगगुरु रामदेव बाबा यांच्या 'पतंजली आयुर्वेद लिमिटेड' कंपनीला हरिद्वार कोर्टाने दणका दिला आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि उत्पादनांचं चुकीचं चित्रण केल्याचा ठपका ठेवत 'पतंजली'ला 11 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
इतर फर्ममध्ये उत्पादन होणारे प्रॉडक्ट्स 'पतंजली'च्या नावाखाली विकत असल्याचं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं आहे. त्यामुळे जाहिरातींतून दिशाभूल केल्याचा ठपका न्यायालयाने 'पतंजली आयुर्वेद लिमिटेड' कंपनीवर ठेवला आहे. पतंजली 5 हजार कोटींचा महसूल पुढील आर्थिक वर्षात दुपटीवर नेण्याच्या प्रयत्नात आहे.
अन्न सुरक्षा आणि मानांकन कायद्याअंतर्गत कलम 52 (मिसब्रँडिंग), कलम 53 (दिशाभूल करणाऱ्या जाहिराती) अन्वये पतंजलीला महिन्याभरात 11 लाखांचा दंड देण्याचे आदेश ठोठावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे भविष्यात त्यांच्या उत्पादनात कोणतीही सुधारणा न आढळल्यास, योग्य ती कारवाई करण्याचे आदेशही अन्न सुरक्षा विभागाला देण्यात आले आहेत.
नोव्हेंबर 2012 मध्ये 'पतंजली आयुर्वेद लिमिटेड' कंपनीविरोधात खटला दाखल करण्यात आला होता. मध, मीठ, मोहरीचं तेल, जाम आणि बेसन यासारख्या उत्पादनांचे नमुने 16 ऑगस्ट 2012 रोजी केलेल्या गुणवत्ता चाचणीत अयशस्वी ठरल्यामुळे ही केस दाखल करण्यात आली होती.