पाटणा : आठ वर्षांपूर्वी पाटण्यातील गांधी मैदानावर (Gandhi Maidan) नरेंद्र मोदींच्या हुंकार सभेत (Hunkar Rally) बॉम्बस्फोटांची मालिका घडली होती. याप्रकरणी आज एनआयएच्या विशेष न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयए कोर्टाने एका आरोपी फखरुद्दीनची सुटका केली आहे. त्याचवेळी हैदर अली, नुमान अन्सारी, मजीबुल्लाह, उमर सिद्दीकी, फिरोज अस्लम, इम्तियाज आलम यांच्यासह नऊ जणांना शिक्षा सुनावण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. 1 नोव्हेंबर रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. या प्रकरणात आतापर्यंत 187 जणांची न्यायालयात सुनावणी झाली आहे.


गांधी मैदान सीरियल बॉम्बस्फोट प्रकरणी पाटणा येथील गांधी मैदान पोलीस ठाण्यात 27 ऑक्टोबर 2013 रोजी एफआयआर दाखल करण्यात आला होता. यानंतर 31 ऑक्टोबर 2013 रोजी एनआयएने या प्रकरणाचा ताबा घेतला आणि 1 नोव्हेंबर रोजी दिल्ली एनआयए पोलिस ठाण्यात पुन्हा एफआयआर नोंदवण्यात आला. यामध्ये एका अल्पवयीनासह 12 जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच बरोबर, अल्पवयीन आरोपीला यापूर्वीच जुवेनाईल बोर्डाने तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.


याआधीच अन्य एका प्रकरणात पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा
या प्रकरणात आरोपी असलेल्या पाच दहशतवाद्यांना यापूर्वीच अन्य एका प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यामध्ये उमर सिद्दीकी, अझरुद्दीन, अहमद हुसेन, फक्रुद्दीन, फिरोज आलम उर्फ ​​पप्पू, नुमान अन्सारी, इफ्तिखार आलम, हैदर अली उर्फ ​​अब्दुल्ला उर्फ ​​ब्लॅक ब्युटी, मोहम्मद आलम उर्फ ​​पप्पू मोजिबुल्ला अन्सारी आणि इम्तियाज अन्सारी ऊर्फ आलम यांचा समावेश आहे. यापैकी इम्तियाज, उमर, अझहर, मोजिबुल्ला आणि हैदर यांना बोधगया साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. 


पाटण्यामध्ये नरेंद्र मोदींची हुंकार रॅली होती. त्यावेळी नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पक्षाकडून राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (NDA) पंतप्रधानपदाचे उमेदवार होते. त्या रॅलीशिवाय पाटणा जंक्शनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 10 वरही स्फोट झाला. यात सहा जणांचा मृत्यू झाला तर 80 हून अधिक जण जखमी झाले होते.