नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी स्वपक्षाबद्दल अत्यंत मोठं वक्तव्य केलं आहे. काँग्रेस पक्ष सध्या अस्तित्त्व राखण्यासाठी झुंज देत आहे, असे जयराम रमेश यांनी म्हटले आहे. पीटीआय वृत्तसंस्थेला जयराम रमेश यांनी मुलाखत दिली.
“सल्तनत चली गई, फिर भी सुल्तानों की तरह बरताव”, असे म्हणत जयराम रमेश यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला. ते म्हणाले, “सत्ता हातून गेली तरी सत्ताधाऱ्यांसारखी वागणूक सुरु आहे. आपल्याला आता केवळ विचार किंवा कामाची पद्धत बदलण्याची गरज नाही, तर लोकांसोबत संवाद वाढवण्याची आणि स्वत:ला प्रोजेक्ट करण्याची पद्धतही पूर्णपणे बदलावी लागेल.”
“काँग्रेस पक्षाने 1996 ते 2004 या काळात सत्तेतून दूर असताना, राजकीय संकटांचा सामना केला आहे. याआधी 1977 मध्ये आणीबाणीमुळे झालेल्या पराभवानंतरही काँग्रेसने राजकीय संकटं झेलली आहेत. मात्र, आता काँग्रेस ज्या संकटांचा सामना करत आहेत, ते राजकीय संकट नाही, तर अस्तित्त्वाचं संकट आहे.”, असे जयराम रमेश यांनी सांगितले.
“आम्हाला हे मान्य करायलाच हवं की, आमची लढाई नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याशी आहे. हे दोघेही वेगळ्या पद्धतीने विचार करतात आणि काम करतात. जर आपण आपल्या दृष्टीकोनात लवचिकता आणली नाही, तर आपण कालबाह्य ठरू. जुन्या घोषणा, फॉर्म्युले आता कामाचे नाहीत. भारत बदलला आहे, काँग्रेसलाही बदल स्वीकारावा लागेल. 2019 साली मोदींना टक्कर द्यायची असेल, तर सर्वांनी एकत्र येऊन शक्ती एकवटावी लागेल.”, असा सल्ला जयराम रमेश यांनी स्वपक्षाला दिला.