Parliament Winter Session: संसदेचं हिवाळी अधिवेशनाच्या (Parliament Winter Session 2023) तारखा लवकरच समोर येऊ शकतात. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. तसेच, ख्रिसमसपूर्वी (Christmas) हिवाळी अधिवेशन आटोपलं जाणार असल्याच्याही चर्चा सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 डिसेंबर रोजी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी पार पडणार आहे. मतमोजणीनंतर काहीच दिवसांत संसदेचं हिवाळी अधिवेशन बोलावलं जाऊ शकतं, तर ख्रिसमसपूर्वी अधिवेशन आटोपलं जाणार असल्याचीही माहिती मिळतेय.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मोदी सरकार तीन महत्त्वाची विधेयकं मांडणार
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात प्रमुख फौजदारी कायद्यांच्या जागी तीन महत्त्वाच्या विधेयकांवर विचार होण्याची शक्यता आहे. गृहविभागाच्या स्थायी समितीनं नुकताच तीन विधेयकांवरील अहवाल स्वीकारला आहे. हिवाळी अधिवेशन सामान्यतः नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होतं आणि ख्रिसमसच्या (25 डिसेंबर) आधी संपतं. पण यावेळी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हिवाळी अधिवेशन सुरू होण्याची शक्यता आहे.
संसदेत प्रलंबित असलेले दुसरं मोठं विधेयक मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीशी संबंधित आहे. पावसाळी अधिवेशनात मांडण्यात आलेलं हे विधेयक विरोधी पक्ष आणि माजी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधानंतर संसदेच्या विशेष अधिवेशनात मंजूर करण्यासाठी सरकारनं आग्रह धरला नाही. या विधेयकाद्वारे सरकारला मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांचा दर्जा कॅबिनेट सचिवांच्या बरोबरीनं आणायचा आहे. सध्या त्यांचा दर्जा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या समकक्ष आहे.
संसदेचं हिवाळी अधिवेशन कधी असतं?
संसदेचं हिवाळी अधिवेशन साधारणतः नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होतं आणि ख्रिसमसच्या सुट्ट्यांपूर्वी आटोपलं जातं. परंतु, यंदा अधिवेशनाबाबत कोणतीही माहिती अद्याप केंद्र सरकारकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे यंदा अधिवेशन कधी? अशा चर्चा सुरू आहेत. अशातच यंदा संसदेचं हिवाळी अधिवेशन डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होऊन ख्रिसमसपूर्वी आटोपलं जाऊ शकतं, असं बोललं जात आहे.