नवी दिल्ली : मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचं पहिलं अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. अधिवेशनच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विरोधी पक्षाने संख्याबळाची चिंता करु नये, आपण नव्या उत्साहात एकत्रपणे काम करु, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं.


जनतेने देशाची सेवा करण्याची आपल्याला आणखी एक संधी दिली आहे. लोकशाहीत विरोधी पक्ष मजबूत असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे संख्याबळाची चिंता विरोधी पक्षाने सोडावी. विरोधी पक्षाचा प्रत्येक शब्द आमच्यासाठी मुल्यवान असेल. संसदेत आपण निष्पक्ष होऊन काम करु. यावेळी संसदेत जनतेच्या हिताचं अधिक काम होईल, अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली.





देशातील नागरिकांच्या आशा, अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही काम करु. आज नवीन खासदारांचा परिचय होणार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदान झालं. यामध्ये महिलांनी मोठ्या प्रमाण मतदान केलं. अनेक दशकांनंतर एका सरकारला बहुमताने जनतेने सलग दुसऱ्यांना निवडूण दिलं. त्यामुळे जनतेचा विश्वास आम्ही पूर्ण करु आणि आगामी पाच वर्षात देशहिताचे निर्णय घेऊ, असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.





योग्य पद्धतीने सरकारवर टीका केल्याने लोकशाही बळकट होते, त्याचे संसदेत सकारात्मक परिणाम झालेले दिसतात, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं. त्यामुळे सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष असं वेगळं काम करण्यापेक्षा देशहितासाठी काम करण्याचं आवाहनही नरेंद्र मोदींनी विरोधकांना केलं.