नवी दिल्ली : संसद सुरक्षा भंग प्रकरणात (Parliament Security Breach) दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) विशेष पथकाला आणखी दोन संशयितांची माहिती मिळाली आहे. अटक आरोपींची दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या पथकाने समोरासमोर चौकशी केली. याआधी देशाच्या विविध भागात आणखी दोन जणांना त्यांच्या जबाब आणि शरीरावरील खुणांच्या आधारे चौकशी करण्यात आली होती. यापैकी बंगळूरमधील एका अभियंत्याला ताब्यात घेण्यात आले आहे, तर उत्तर प्रदेशातील जालौन येथील एका व्यक्तीचीही सखोल चौकशी करण्यात आली आहे. एबीपीए न्यूजच्या सूत्रांनी सांगितले की, संसद भवन प्रकरणात पोलीस तपासात आणखी दोन संशयितांची नावे समोर येत आहेत.


बंगळूरमध्ये अभियंता ताब्यात, उत्तर प्रदेशातही चौकशी 


दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या पथकाने कर्नाटकातील बागलकोट शहरातून एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला ताब्यात घेतले आहे. त्याचे नाव साई कृष्ण आहे. त्याचे वडील उच्च पोलिस अधिकारी आहेत. साई हा मनोरंजनचा मित्र असल्याचं म्हटलं जात आहे. बुधवारी रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी त्याची चौकशी केली, त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन दिल्लीत आणण्यात आले. याशिवाय उत्तर प्रदेशातील जालौन येथील अतुल कुलश्रेष्ठनावाच्या व्यक्तीचीही पोलिसांनी चौकशी केली आहे. अतुल कुलश्रेष्ठ 50 वर्षाचा असून तो सुद्धा बेरोजगार आहे. दोघांचे जबाब नोंदवण्यात आले असून, संसदेच्या प्रकरणातील त्यांच्या सहभागाचा तपास सुरू आहे. सुरक्षा भंगात त्यांची काही भूमिका होती का, याचा तपास करण्यात येत आहे.


संसदेत घुसखोरी  (Parliament Security Breach) 


पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, 13 डिसेंबर रोजी लोकसभेत सागर शर्मा आणि मनोरंजन डी. या दोन व्यक्तींनी शून्य प्रहरात प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उडी मारली होती आणि यादरम्यान त्यांनी एका मधून कॅनमधून पिवळा धूर सोडला होता. या दोघांनाही नंतर काही खासदारांनी पकडले. 


त्याच सुमारास अमोल शिंदे आणि नीलम देवी या दोघांनी संसद भवन परिसराबाहेर 'कॅन'मधून धूर सोडत 'हुकूमशाही चालणार नाही' अशा घोषणा देत निदर्शने केली. या चौघांव्यतिरिक्त पोलिसांनी मुख्य सूत्रधार ललित झा आणि महेश कुमावत यांनाही अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध बेकायदेशीर कृत्य (प्रतिबंध) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


आरोपींनी कर्नाटकात बैठक घेतली होती (Parliament Security Breach) 


सूत्रांनी सांगितले की, पोलिसांनी 'मेटा'वरून अनेक व्हॉट्सअॅप ग्रुप सदस्यांचे तपशील तसेच 'चॅट्स' घेतले आहेत. ते भगतसिंग आणि चंद्रशेखर आझाद यांच्या नावाने व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून चालवायचे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुरक्षा भंगाची योजना आखण्यासाठी 'सिग्नल' अॅपवरही बोलत होते. गेल्यावर्षी कर्नाटकातील म्हैसूर येथे भेटले होते. एका अधिकाऱ्याने सांगितले की, म्हैसूरचे रहिवासी मनोरंजनने या पाच जणांचा प्रवास खर्च उचलला होता. झा आणि कुमावत यांनी राजस्थानमध्ये मोबाईल फोन कथितरित्या नष्ट केले होते. चार आरोपींचे बनावट सिमकार्ड परत मिळवण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या