नवी दिल्ली : गोरक्षा आणि त्याच्या नावावर होणाऱ्या देशभरातील हिंसाचाराच्या मुद्द्यावर लोकसभेत जोरदार गोंधळ पाहायला मिळाला. चर्चेदरम्यान काँग्रेसच्या खासदारांनी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्यावर कागद फेकले. त्यामुळे काँग्रेसच्या 5 खासदारांचं निलंबन करण्यात आलं.

गोंधळामुळे लोकसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. निलंबनाच्या कारवाईमुळे काँग्रेसच्या 5 खासदारांना पुढील पाच दिवस संसदेत बसता येणार नाही.

सुष्मिता देव, गौरव गोगोई, के. सुरेश, अभिरंजन चौधरी आणि रंजीता रंजन यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

गोरक्षेच्या नावावर होणाऱ्या हिंसेमुळे देशभरात भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे गोरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा व्हावी, अशी मागणी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. गोरक्षेच्या नावावर गुंडगिरी सहन केली जाणार नाही, असं स्पष्टीकरण संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी दिलं.