PM Modi LIVE : अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session 2023) आतापर्यंत संसदेत (Parliament) बहुतांश वेळा गदारोळच पाहायला मिळाला. विरोधी पक्षांची (Opposition) अडवणूक आज सरकारसाठी आव्हान ठरणार आहे. गौतम अदानींच्या (Gautam Adani) मुद्द्यावरुन विरोधक फ्रंटफूटवर खेळत आहेत. विरोधकांच्या हल्ल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "आमच्यावर जेवढा चिखल फेकाल कमळ तेवढंच चांगलं फुलेल, असे पंतप्रधान म्हणाले. काँग्रेसने (Congress) सहा दशकं देशाचं वाटोळं केलं. देशाच्या प्रश्नांवर कायमचं उत्तर शोधण्याचा काँग्रेसने कधीच प्रयत्न केला नाही," अशी टीकाही मोदींनी केली.


पीएम मोदींच्या भाषणादरम्यान गदारोळ


राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (9 फेब्रुवारी) राज्यसभेत उत्तर दिलं. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर जी चर्चा सुरु आहे, त्या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल मी आदरणीय राष्ट्रपतींचे आभार मानतो. मी त्यांचे अभिनंदन करतो. दोन्ही सभागृहांना संबोधित करताना राष्ट्रपतींनी विकसित भारताचा रोडमॅप मांडला. परंतु पतंप्रधान मोदींच्या भाषणादरम्यान विरोधी पक्षाने जोरदार गदारोळ केला. यावेळी विरोधी पक्षाच्या खासदारांनी मोदी-अदानी भाई भाईच्या घोषणा दिल्या. मात्र, या गोंधळात पंतप्रधान मोदींनी आपले भाषण सुरुच ठेवले. भाषणादरम्यान पंतप्रधान मोदींनी त्यांच्या सरकारच्या कामांचा उल्लेख केला. त्यांनी मध्येच काँग्रेसला टोलाही लगावला.


'जेवढा चिखल फेकाल कमळ तेवढंच चांगलं फुलेल'


विरोधकांना टोला लगावत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कीचड़ उसके पास था, मेरे पास गुलाल, जो भी जिसके पास था, उसने दिया उछाला, जितना कीचड़ उछालोगे कमल उतना ही खिलेगा अर्थात "त्याच्याकडे चिखल होता, माझ्याकडे गुलाल होता, त्याच्याकडे जे काही होतं त्याने उधळलं, जेवढा चिखल फेकाल कमळ तेवढंच चांगलं फुलेल. त्यामुळेच कमळाच्या फुलवण्यात तुमच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष योगदानाबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. काँग्रेसने फक्त खड्डेच केल्याचं मी 2014 नंतर पाहिलं.


लोकसभेनंतर राज्यसभेत पंतप्रधान मोदींचं उत्तर


लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभाराच्या चर्चेला उत्तर दिल्यानंतर पंतप्रधान मोदींनी आज राज्यसभेत उत्तर दिलं. लोकसभेत राहुल गांधी यांचे नाव न घेता पंतप्रधानांनी विरोधकांवर निशाणा साधला होता. आजही मोदी उत्तर देत असताना विरोधकांना जोरदार गोंधळ केला.


संबंधित बातमी


PM Narendra Modi : काँग्रेसनं सहा दशकं देशाचं वाटोळं केलं, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं टीकास्त्र