Pankaja Munde : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस सरकारचा नुकताच मंत्रिमंडळ विस्तार (cabinet expansion) पार पडला. यामध्ये एकाही महिला आमदाराला स्थान न देण्यात आल्यामुळे शिंदे सरकारवर (Eknath Shinde) टीकास्त्र सोडण्यात आले. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे अनेकजण नाराज असल्याचेही समोर आले आहे. त्यातच मंत्रिमंडळ विस्तारामध्ये पंकजा मुंडे (Pankja munde) यांना स्थान मिळणार अशी चर्चा होती. पण प्रत्यक्षात पंकजा मुंडे यांना स्थान देण्यात आलं नाही. त्यामुळे पंकजा मुंडे यांची खदखद पुन्हा एकदा समोर आली. मंत्रिमंडळात स्थान का मिळालं नाही, यावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, 'माझी पात्रता नसेल म्हणून मला मंत्रिपद दिलं नसेल.' पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्यानंतर त्यांची नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे. 


दरवर्षीप्रमाणे यंदाही पंकजा मुंडे यांनी महादेव जानकर यांना राखी बांधली आणि रक्षाबंधनाचा सण साजरा केला. भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि महादेव जानकर दरवर्षी रक्षाबंधनाचा सण साजरा करतात. याही वर्षी पंकजा मुंडे यांनी महादेव जानकर यांना राखी बांधली. अवघ्या देशभरात आज रक्षाबंधनाचा उत्साह पाहायला मिळतोय. राजकीय वर्तुळातही सर्वांनी हा सण अतिशय अनंदात साजरा केला. 


महादेव जानकर यांना राखी बांधल्यानंतर पंकजा मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, 'आम्ही दरवर्षी रक्षाबंधन साजरा करतो.  आज रक्षाबंधनचा दिवस आहे, म्हणून राजकीय बोलणार नाही. सगळयांना माझ्या शुभेच्छा. ओबीसीचे आरक्षण पुन्हा मिळवावे, अशी या सरकारकडून अपेक्षा आहे. कदाचित माझी पात्रता नसेल म्हणून मंत्रिपद दिलं नसेल. जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा मंत्रिपद देतील. यावर माझं काहीच म्हणणं नाही. '  दरम्यान, संजय राठोड यांना मिळालेल्या मंत्रिपदावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की,  ज्यांनी मंत्रिपद दिलंय त्यांना विचारा मी यावर का बोलणार ??


मंत्रिमंडळ विस्ताराला पंकजा मुंडेंची अनुपस्थिती-
18 आमदारांचा मंत्रिमंडळ विस्तार नुकताच पार पडला. या मंत्रिमंडळ विस्ताराला अनेक भाजपच्या नेत्यांनी उपस्थिती दर्शवली होती. यामध्ये विनोद तावडे यांचाही समावेश होता. पण या मंत्रिमंडळ विस्तारावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे उपस्थित नव्हत्या. त्यांनी ट्विट करुन आपली भावना व्यक्त केली होती. नवनिर्वाचित मंत्री मंडळातील सर्व मंत्री महोदय यांचे अभिनंदन.... महाराष्ट्र अपेक्षा ठेवून पाहत आहे आपल्याकडे त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा... विकास आणि विश्वास याची जोड ठेवून तुम्ही सर्व जण काम करून महाराष्ट्र राज्याची भरभराट कराल अशी शुभकामना! असे ट्वीट पंकजा मुंडे यांनी केलं होतं. 


पंकजा मुंडे नाराज?
विधानपरिषदेच्या निवडणुकीत संधी न मिळाल्याने पंकजा मुंडे या नाराज असल्याची चर्चा आहे. पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी वेळोवेळी विविध प्रकारे आपली नाराजी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांच्या वाढदिवशी लावलेल्या फ्लेक्सवर कोणत्याही भाजप नेत्याचं नाव नव्हतं. यापूर्वीही पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्रिपदाच्या दावेदार मानलं जात होतं. मात्र पक्षाकडून त्यांना या विधानसभेच्या निवडणुकीत संधी देण्यात आली नाही. वारंवार डावललं जात असल्यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा आहे.