ट्रेंडिंग
Panchkula Family ends life: अख्ख्या कुटुंबाने कारमध्ये उलट्या करत जीव सोडला, प्रवीण मित्तल म्हणाले, 'मी 5 मिनिटांत मरणार अन् खाली...'
Panchkula Family ends life: विष अंगात उशीरा भिनलं, कुटुंबातील प्रत्येकाने डोळ्यांदेखत जीव सोडला; प्रवीण मित्तल हतबद्धपणे कारबाहेर येऊन बसले होते.
पंचकुला, हरियाणा: हरियाणातील पंचकुला या ठिकाणाहून एक अत्यंत हृदयद्रावक घटना सोमवारी रात्री पंचकुला येथे घडली आहे. उत्तराखंडमधील देहराडून येथील प्रविण मित्तल (वय 42) यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सात सदस्यांचा एका कारमध्ये मृतावस्थेत आढळून आले. प्राथमिक तपासानुसार, प्रचंड कर्जबाजारीपणामुळे या कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. प्रविण मित्तल, त्यांचे वृद्ध आई-वडील, पत्नी आणि तीन मुले - दोन 13 वर्षांच्या जुळ्या मुली आणि 15 वर्षांचा मुलगा हार्दिक हे सर्वजण बागेश्वर धाम येथील धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावून परतत होते. मध्यरात्री कार पंचकुला येथील एका घराजवळ पार्क करण्यात आली होती. स्थानिक रहिवाशांना गाडीबाबत संशय आला आणि जेव्हा त्यांनी आत पाहिलं, तेव्हा त्यांना सर्वांचे मृतदेह दिसले. (Hariyana Crime News)
“गाडीत सगळे मरण पावले, मी 5 मिनिटांत मरणार आहे”
स्थानिक रहिवासी पुनीत राणा यांनी या घटनेबाबत सांगितले की, रात्री फेरफटका मारताना त्यांना परिसरामध्ये चारचाकी गाडीमध्ये टॉवेल लटकलेला दिसला. त्यांना त्या कारबाबत संशय येताच त्यांनी गाडीजवळ असलेल्या एका व्यक्तीशी बोलण्याचा प्रयत्न केला. संबंधित व्यक्तीने आपले नाव प्रविण मित्तल असल्याचे सांगत, “हॉटेल मिळाले नाही, म्हणून गाडीतच रात्र काढत आहोत,” असं सांगितलं.
मात्र काही क्षणातच पुनीत राणा यांना गाडीतून दुर्गंधी आणि उलट्यांचा वास जाणवताच त्यांनी कारच्या आतमध्ये डोकावले. आत सहा जण मृतावस्थेत होते. कारमध्ये वृद्ध आई-वडील, पत्नी आणि तीन मुले - दोन 13 वर्षांच्या जुळ्या मुली आणि 15 वर्षांचा मुलगा हार्दिक उलट्या करून मृत अवस्थेत पडलेले होते. त्यावेळी प्रविण मित्तल यांनी पुनीत राणा यांना सांगितले की, “सगळ्या कुटुंबाने आत्महत्या केली आहे आणि मीही 5 मिनिटांत मरणार आहे”, इतकंच बोलून ते खाली पडले. मित्तल कुटुंबीयांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी सर्वांना मृत घोषित केले. राणांनी सांगितले की, जर वेळेत अॅम्ब्युलन्स आली असती, तर कदाचित प्रविण मित्तल यांचा जीव वाचू शकला असता.
पोलीस तपास सुरू; सुसाइड नोट सापडली
घटनेनंतर पंचकुला पोलीस उपायुक्त हिमाद्री कौशिक व अमित दहिया यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी एक सुसाइड नोटही सापडली असून, तिचा तपशील लवकरच उघड केला जाणार आहे. पोलीस याप्रकरणी पुरावे गोळा करत असून, प्राथमिक अंदाजानुसार कुटुंब मोठ्या आर्थिक संकटात होते.