इस्लामाबाद : पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशिद यांनी भारता विरोधात अणुबॉम्ब वापरण्याची धमकी दिली आहे. भारतासोबत सुरु असलेल्या तणावपूर्ण संबंधांबाबत बोलताना रशिद यांनी थेट दावा केला आहे की, पाकिस्तानने आपलं हत्यार तयार ठेवलं आहे आणि जर भारताने हल्ला केला, तर पारंपारिक युद्ध होणार नाही, थेट अणुबॉम्ब वापरू, ज्यामध्ये आसामलाही निशाणा केलं जाऊ शकतं.'


दरम्यान, शेख रशिद यांनी भारताविरोधात बरळ ओकल्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही एका टीव्ही चॅनलला देण्यात आलेल्या इंटरव्ह्यू दरम्यान, वैश्विक राजनितीची समीकरणांवर बोलताना शेख रशीद म्हणाले होते की, आज चीन अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि ब्रिटनच्या विरोधात उभा आहे. तर आपले नवे मित्र नेपाळ, श्रीलंका, इराण आणि रशियासोबत नवा ब्लॉक तयार करत आहे. रशिद म्हणाले की, अशातच पाकिस्तानलाही चीनसोबत उभं राहणं गरजेचं आहे.'

युद्ध झाल्यास भारताविरोधात अणुबॉम्ब वापरू : शेख रशिद अहमद

शेख रशिद म्हणाले की, जर पाकिस्तानवर भारताने हल्ला केला तर, पारंपारिक युद्धाला वाव राहणार नाही. हे रत्तपात घडवणारं, शेवटचं आणि एक अणु युद्ध असेल. आमचं हत्यार कॅलक्युलेटेड, छोटं, परफेक्ट निशाण्यावर आहे. आसामपर्यंत टार्गेट केलं जाऊ शकतं. पाकिस्तानजवळ पारंपारिक युद्धाला वाव कमी आहे.' याआधीही काही आठवड्यांपूर्वी भारताला धमकी देताना ते म्हणाले होते की, पाकिस्तानजवळ सव्वाशे ग्रॅम आणि अडीचशे ग्रामचेही अणुबॉम्ब आहेत. जे एखाद्या खास निशाण्यावर मारले जाऊ शकतात.