नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवण्याची शिफारस केली आहे. तसंच जम्मू काश्मीरच्या विभाजनाचा प्रस्ताव सादर केला आहे. देशभरात चर्चेत असलेलं आणि जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं हे कलम हटवण्याची चर्चा सुरु असताना पाकिस्तानचा मात्र जळफळाट सुरु झाला आहे.


पाकिस्तान पंतप्रधान इमरान खान यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, ' अमेरिकेचे राष्‍ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांनी काश्मीर मुद्द्यावरून मध्यस्थी करण्याचे वचन दिले होते. आता ती वेळ आली आहे. स्थिती बिघडत चालली असून एलओसीवर भारतीय सैन्य आक्रमक होत आहे. यामुळे क्षेत्रीय संकट निर्माण होऊ शकते', असे त्यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारकडून जम्मू-काश्मीरमध्ये अतिरिक्त जवान पाठवून सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याचा निर्णय घेतल्यानंतर रविवारी पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीने बैठक घेतली.  या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पाकिस्तानने म्हटले आहे की, भारताने जर काही कारवाई केली तर पाकिस्तान त्याचे उत्तर नक्की देईल. भारताच्या या आक्रमक निर्णयाने काश्मीरमध्ये हिंसा वाढेल आणि अस्थिर होईल. भारत जे काही करत आहे तो पर्याय खूप विघातक आहे, असेही पाकिस्तानने म्हटले आहे. भारताकडून पीओके मध्ये क्लस्टर बॉम्ब टाकल्याचा देखील आरोप पाकने केला आहे.

सरकारने जम्मू काश्मीरसंबंधी ऐतिहासिक निर्णय घेत राज्याला स्वतंत्र दर्जा देणारं वादग्रस्त 370 कलम  हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली  आहे. पाकिस्तानमधील शेअर बाजारात याचा परिणाम दिसला असून खूप मोठी घसरण झाली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी संसदीय समितीची बैठक बोलावली आहे. दरम्यान पाकिस्तानने भारताला पोकळ धमकी दिली असून भारताने अत्यंत धोकादायक खेळी केली असून, याचे गंभीर परिणाम होऊ शकतात असं म्हटलं आहे.

भारत सरकारने एकतर्फी निर्णय घेतल्याचं पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे. भारताच्या या निर्णयाचा विरोध करण्यासाठी पाकिस्तान शक्य ते सर्व पर्याय वापरणार असल्याचे देखील त्यांनी म्हटलं आहे.