नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. दहशतवादाचा प्रश्न सोडवण्यासाठी आणि आणि पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने आक्रमक धोरण स्वीकारल्याने पाकिस्तान घाबरला असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. भीतीपोटी पाकिस्तानने भारत-पाक सीमेवरील बंदोबस्तात वाढ केली आहे. पाकिस्तानी माध्यमांनीदेखील या बातमीला दुजोरा दिला आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय जनतेकडून पाकिस्तानचा प्रश्न कायमचा सोवडवण्यासाठी पाकिस्तानसोबत युद्धाची मागणी होत आहे. भारतदेखील पाकिस्तान, तेथील दहशतवाद आणि काश्मीरप्रश्नी आक्रमक झाला आहे. भारत-पाक सीमेवर खूप जलद घडामोडी घडत आहेत. त्यामुळे भारत पाकिस्तानवर हल्ला करण्याच्या अथवा मोठ्या कारवाईच्या पावित्र्यात असल्याची पाकिस्तानला भीती वाटत आहे. त्यामुळेच LOC जवळ राहणाऱ्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे सियालकोट सीमेजवळ पाकिस्ताने मोठ्या प्रमाणात रणगाडे तैनात केले आहेत. अजूनही काही रणगाडे भारत-पाक सीमेजवळ रवाना करण्यात आले आहेत. पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक गावांना रिकामं केलं आहे. नियंत्रण रेषेजवळील लोकांची ये-जा थांबवण्यात आली आहे. तसेच काश्मीरमधील सीमेजवळच्या 125 हून अधिक गावांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, भारताने पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्याचे प्रयत्न केले आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताने पाकिसातनला चांगलंच जेरीस आणला आहे.