नवी दिल्ली : पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आलं असून भारताच्या अनेक शहरांवर ड्रोन हल्ले झाल्याची माहिती आहे. पण हे सर्व ड्रोन हल्ले भारताने निकामी केले असून पाकिस्तानला पुन्हा तोंडावर पाडण्याची कामगिरी केली. जैसेलमेरमध्ये भारतीय लष्कराने पाकिस्तानचे दोन ड्रोन पाडले आहेत. अवंतीपुरामध्येही भारताने तशीच कारवाई केली. 

उरी, कुपवाडामध्ये गोळीबार 

उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार सुरू झाला झाला आहे. त्याला भारताकडूनही प्रत्युत्तर देण्यात येत आहे. त्यामुळे सीमावर्ती भागात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याची स्थिती आहे. पाकिस्तानने पूंछ आणि कुपवाडा सेक्टरमध्येही सीमेपलीकडून गोळीबार केला. सीमेपलीकडून ड्रोन डागण्यात आले आहेत. नौगाम हंदवाडा सेक्टरमध्येही पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. 

पाकिस्तानचे ड्रोन हवेतच नष्ट

पाकिस्तानने अवंतीपुरा हवाई दल तळावर ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने ते हवेतच नष्ट केले. पाकिस्तानी ड्रोन पाडण्यात आले तेव्हा 15-20 स्फोटांचे आवाज ऐकू आले. कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

सध्या देशभरातील सातहून अधिक संवेदनशील ठिकाणी लष्करी हालचाली तीव्र झाल्या आहेत. सांबा, जम्मू आणि पठाणकोटमध्ये ड्रोन हालचालींसह गोळीबार आणि ब्लॅकआउटचे वृत्त आहे. उत्तर काश्मीरमधील कुपवाडा, उरी, नौगाम-हंदवाडा सेक्टर आणि पूंछमध्ये नियंत्रण रेषेजवळ जोरदार गोळीबार सुरू आहे. सुरक्षा दल पूर्ण दक्षतेने प्रत्येक आघाडीवर प्रत्युत्तरात्मक कारवाईत गुंतले आहेत.

जम्मूत ड्रोन निकामी केले

जम्मू, सांबा आणि पठाणकोटमध्येही ड्रोन दिसल्याची पुष्टी झाली आहे. सुरक्षा दलांनी या ड्रोन हालचालींवर तात्काळ कारवाई केली आणि त्यांना निष्क्रिय केले. संपूर्ण परिसरात हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

पाकिस्तानकडून झालेल्या ड्रोन हल्ल्याचा व्हिडीओही समोर आला आहे. सुरक्षा दलांनी लगेच प्रत्युत्तर दिले आणि हवेत इंटरसेप्टर क्षेपणास्त्र सोडले. स्फोटाचा हलका आणि सौम्य आवाज दूरवरून स्पष्टपणे ऐकू येतो, ज्यामुळे ड्रोन निष्क्रिय होतो. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात अलर्ट जारी करण्यात आला आहे आणि लष्कराने शोध मोहीम सुरू केली आहे.

भारतीय सुरक्षा दलांनी जम्मू आणि राजस्थानमधील पोखरणमध्ये संशयास्पद ड्रोन घुसखोरी यशस्वीरित्या उधळून लावली. हाय अलर्ट दरम्यान, ड्रोनला अडवण्यात आले आणि निष्क्रिय करण्यात आले, ज्यामुळे संभाव्य धोका टळला.

गुजरातच्या कच्छमध्ये ब्लॅकआऊट

पंजाबमधील तरणतारण परिसरात स्फोटांचे मोठे आवाज येत आहेत. तरण तारण परिसरातही पाकिस्तानने तोफगोळे डागल्याची शक्यता आहे. गुजरातमधील कच्छमध्ये संपूर्ण ब्लॅकआऊट करण्यात आलं आहे. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेण्यात आली आहे.