नवी दिल्ली : भारताच्या एअर स्ट्र्राईकने पाकिस्तान बावचळला असून पाकिस्तानचे (Pakistan) नेते आणि मंत्री काहीही बरळत आहेत. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी जगभरातील विविध देशांच्या परराष्ट्र खात्याशी संपर्क साधत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीची माहिती दिली. यावेळी, बहुमतांशी देशांनी दहशतवादाविरुद्ध एकत्रितपणे लढण्याचे म्हटले. मात्र, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धात आपली भूमिका तटस्थ असल्याचंही त्यांनी म्हटलं. दरम्यान, पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा मुहम्मद आसिफ यांनी आज पाकिस्तानच्या संसदेत माहिती देताना त्यांच्याच खासदारांची दिशाभूल केल्याचं दिसून आलं. भारत सध्या एकटा पडला असून जगभरातील सर्वच देश पाकिस्तानसोबत आहेत. भारत (india) आणि इस्रायल इस्लामचे दुश्मन असून केवल इस्रायल हाच देश भारतासोबत असल्याचेही आसिफ यांनी म्हटले.
जगभरातील सर्वच इस्लामिक देश आजच्या परिस्थितीत पाकिस्तानसोबत आहेत. तसेच, इतर देशही पाकिस्तानसोबत असून चीन, तुर्कस्तान आणि अजबैजान या देशांचा पाकिस्तानला पाठिंबा आहे, अशी माहितीही ख्वाजा आसिफ यांनी दिली. भारतासोबत एकमेव इस्रायल देश आहे, कारण भारत आणि इस्रायल यांचा एकच उद्देश आहे. हे दोन्ही देश इस्लामचे दुश्मन आहेत, अशी मुक्ताफळे संरक्षणमंत्र्यांनी आज पाकिस्तानच्या संसदेत उधळल्याचं पाहायला मिळालं.
ख्वाजा मुहम्मद आसिफ म्हणाले की, जगभरातील असा कुठला देश नाही, ज्यासोबत आपले संबंध चांगले नाहीत. गल्फमधील आपल्या बंधुराष्ट्रांसमवेत, अरब देशांसोबत आपले चांगले संबंध आहेत. ईराणचे विदेशमंत्री दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानमध्ये आले होते, तेव्हा दिवसभर त्यांच्यासमवेत चर्चा झाली. आपले परराष्ट्र मंत्री देखील युएई, सौदी अरेबिया आणि कतारसमवेत डेली बेसिसवर चर्चा करत आहेत. चीनसोबतही दररोज वार्ता होत आहे, तसेच युएनच्या सिक्युरिटी कौन्सिलमध्येही आपले युएन मिशन परिणामकारक बाजू मांडत आहे. भारताला ते उत्तर देत आहेत, हे प्रयत्न अधिक जोमाने करत आणखी परिणामकारक करण्याची गरज असल्याचे संरक्षणमंत्र्यांनी म्हटलं.
भारताच्या पाठीशी केवळ 1-2 देश
आत्तापर्यंत केवळ 1-2 देशांनी भारताला पाठिंबा दिला आहे. त्याशिवाय जगभरातील सर्वच देश न्यूट्रल आहेत. काही देश आमचे मित्र आहेत, जे क्लिअर कट पाकिस्तानसोबत आहेत. तुर्की, चीन आणि अजबैजान हे देश पाकिस्तानसोबत आहेत. तर, भारतासोबत केवळ इस्रायल आहे. इस्रायलने भारताची साथ देणे ही कूटनीती आहे. दे दोन्ही देश इस्लामचे दुश्मन आहेत. मुस्लिम संस्थान आणि मुस्लिमांच्या विरोधात ते एकत्र येत असल्याची मुक्ताफळे संरक्षणमंत्री आसिफ यांनी उधळली आहेत.
हेही वाचा
रावणवाडीत नवऱ्यानेच बायकोला संपवलं; पती-पत्नीच्या भांडणात दीड वर्षीय चिमुकला अनाथ
