नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 मे रोजी रात्री 8 वाजता देशाला संबोधित केलं होतं. त्यामध्ये त्यांनी ऑपरेशन सिंदूर स्थगित केलं असून पूर्णपणे थांबवलेलं नसल्याचं म्हटलं होतं. मोदी म्हणाले होते की पाकिस्तानमध्ये दहशतवादी आणि लष्करी ठिकाणांवरील कारवाईला स्थगित केलं आहे. पाकिस्तान यापुढं कसं वागतंय त्याप्रमाणं त्याला उत्तर दिलं जाईल. पाकिस्ताननं भविष्यात काही चूक केली तर भारताची तिन्ही सैन्यदलं उत्तर देण्यास तयार आहे. मोदींच्या या वकत्व्यावर पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाची प्रतिक्रिया समोर आली आहे.
पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयानं म्हटलं की भारताच्या आक्रमक कारवाईमुळं पाकिस्तान संकटाच्या दारात उभा आहे. पाकिस्ताननं नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यांवर देखील आक्षेप घेतले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरुन या क्षेत्रात शांततेसाठी प्रयत्न सुरु असताना मोदींकडून आक्रमक भाषणं सुरु असल्याचा कांगावा पाकिस्ताननं केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमधील आदमपूर एअरबेसवरुन पाकिस्तानला इशारा दिला. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी एक वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, त्यांनी दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले आहेत. ख्वाजा आसिफ यांचं वक्तव्य पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर खराब होत असलेली प्रतिमा वाचवण्याचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे.
भारतानं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी 7 मे रोजी पाकिस्तानच्या चार आणि पाक व्याप्त काश्मीरच्या 5 अशा एकूण 9 ठिकाणांवर एअर स्ट्राइक केले होते. भारतानं केलेला स्ट्राईक हा लष्कर-ए-तोयबा,जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीनच्या ठिकाणांवर होता. भारतीय हवाई हल्ल्यात 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले. यामुळं पाकिस्तानात दहशत वाढली आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवरुन वाढलेला दबाव यामुळं पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाकडून दहशतवाद्यांसोबत असलेले संबंध नाकारले जात आहेत. त्यांच्याकडून आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिमा वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारतानं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी आक्रमकपणे एअर स्ट्राईक करण्यात आले. या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांची 9 ठिकाणं उद्धवस्त करण्यात आली. यामुळं भारतानं जगाला एअर फोर्सची ताकद दाखवून दिली.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी काही दिवसांपूर्वी स्काय न्यूजला दिलेल्या मुलाखतीत मान्य केलं होतं की त्यांचा देश यूरोप आणि अमेरिकेसाठी गेल्या तीन दशकांपासून दहशतावद्यांचं पालन करत होता. आता ख्वाजा आसिफ यांनी दहशतवादासोबतचं नातं तोडल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान भारतानं दहशतवाद आणि व्यापार एकाच वेळी होणार नसल्याचं म्हटलं. तर, दहशतवादी आणि चर्चा देखील एकाच वेळी होणार नाही.