नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी जाहीर झाली असली तरी या दोन्ही देशांमधील तणाव काही केल्या कमी होत नाही. भारतातील पाकिस्तानी अधिकारी वेगवेगळ्या अवैध कृत्यांमध्ये गुंतले असल्याने त्यांच्यावर आता कारवाई सुरू झाली आहे. नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील एका अधिकाऱ्याला (Pakistani Embassy Officer) भारताने 'पर्सोना नॉन ग्राटा' (Persona Non Grata) घोषित केलं असून त्याला 24 तासांच्या आत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केले की, नवी दिल्लीतील पाकिस्तानच्या उच्चायुक्त कार्यालयात (Pakistani Embassy New Delhi) कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याला 'पर्सोना नॉन ग्राटा' घोषित करण्यात आले आहे. या अधिकाऱ्याने भारतातील त्याच्या राजनैतिक पदाला न शोभणाऱ्या कृत्यांमध्ये भाग घेतल्याने त्याला 24 तासांच्या आत भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कृत्याच्या स्वरूपाबद्दल अधिक माहिती उघड करण्यात आलेली नाही.
जर परराष्ट्राचा अधिकारी हा गुप्तचर कारवायांमध्ये सामील असेल किंवा अंतर्गत प्रश्नांमध्ये हस्तक्षेप करत असेल तर 1961 च्या व्हिएन्ना करारान्वये तो देश संबंधित अधिकाऱ्यावर अशा प्रकारची कारवाई करू शकतो. हा निर्णय भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये वाढत्या तणावाचे संकेत देतो.
अधिकृत माहितीनुसार, पाकिस्तानच्या उच्चायुक्त कार्यालयातील हा अधिकारी त्याच्या राजनैतिक पदाला न शोभणाऱ्या कृत्यांमध्ये सहभागी होता. त्यामुळे त्याला 'पर्सोना नॉन ग्राटा' घोषित करण्यात आले आहे. या निर्णयामुळे भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये आणखी तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
जेएफ-17 पडल्याचं पाकिस्ताने कबुल केलं
भारताच्या ऑपरेशन सिंदूरबाबत सातत्याने खोटी माहिती, जगभरात पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्ताने त्यांचं चीनी बनावटीचं जेएफ-17 लढाऊ विमान भारताने पाडल्याच्या दाव्याला पुष्टी दिली आहे. पाकिस्तानने जाहीर केलेल्या 11 मृत सैनिकांच्या यादीत, स्क्वॉड्रन लीडर उस्मान युसूफ यांचाही समावेश आहे.
जकोबाबाद विमानतळावरून उस्मान युसूफ आणि त्याचे सहकारी, जेएफ-17विमानाने हवेत उड्डाण करण्याच्या तयारीत होते. त्यावेळी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हवाई तळावर हल्ला चढवला त्यात ते मृत्यूमुखी पडले. भारतीय हवाई दलाच्या या एअर स्ट्राईकमध्ये पाकिस्तानच्या लष्करी तळावरील यंत्रणेचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.