Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधला तणाव आता चांगलाच वाढलाय. दोन्ही देशांमध्ये कोणत्याही क्षणी युद्धाला तोंड फुटेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाकिस्तानकडून सीमारेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन वारंवार केले जात आहे. दरम्यान जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममधील बैसरन घाटीत झालेल्या हल्ल्यानंतर आता बैसरन घाटीच्या (Baisaran) आसपासच्या जंगलांमध्ये कॉम्बिंग आणि सर्च ऑपरेशनदरम्यान काल (5 एप्रिल) रोजी सुरक्षा दलाच्या जवानांनी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. (Jammu Kashmir)
जेंव्हा सुरक्षा दलाच्या जवानांनी या संशयिताला पकडलं तेंव्हा तो बुलेटप्रूफ जॅकेटचे कव्हर घालून असल्याची माहिती समोर येत आहे. या व्यक्तीची कसून चौकशी केल्यानंतर त्याला कुठल्याही प्रश्नाचं समाधानकारक उत्तर देता येत नसल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे सुरक्षा दलाच्या जवानांनी या संशयिताला पोलीसांच्या ताब्यात दिलंय.
बैसरन घाटीत नक्की घडलं काय?
पहलगाम हल्ल्यानंतर बैसरन दरीआणि आसपासच्या जंगलांमध्ये सुरू असलेल्या कॉम्बिंग आणि सर्च ऑपरेशनदरम्यान सुरक्षा दलाच्या जवानांनी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. हा प्रकार सोमवारी घडला असून संबंधित व्यक्ती संशयास्पद हालचाली करताना आढळून आला. सुरक्षा दलाने त्याला तात्काळ ताब्यात घेतले व त्याची चौकशी केली. विशेष म्हणजे, ही व्यक्ती बुलेटप्रूफ जॅकेटचे कव्हर घालून होती. सुरक्षा दलाच्या जवानांना त्याचे हे वर्तन संशयास्पद वाटले. चौकशीदरम्यान संबंधिताने कोणताही स्पष्ट किंवा समाधानकारक उत्तर दिले नाही. बुलेटप्रूफ जॅकेटचे कव्हर त्याच्याकडे कुठून आले, यासंबंधी विचारले असता त्याला उत्तर देता आलं नाही.
संशयिताच्या मानसिक स्थितीवर शंका
सुरक्षा दलाच्या अधिकार्यांनी या व्यक्तीच्या वर्तनावरून त्याच्या मानसिक स्थितीबाबतही शंका व्यक्त केली आहे. त्यामुळे पुढील तपासासाठी आणि वैद्यकीय परीक्षणासाठी या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी त्याची ओळख पटवण्याचा तसेच तो कोणत्याही अतिरेकी गटाशी संबंधित आहे का, याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. या घटनेमुळे बैसरन घाटी परिसरात सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. जंगल परिसरात अजूनही सर्च ऑपरेशन सुरू असून, इतर कोणतेही संशयित व्यक्ती किंवा वस्तू आढळून येतात का, यावर लक्ष केंद्रित केले जात आहे. सुरक्षा यंत्रणा आणि पोलिस यांच्यात समन्वयाने तपास सुरू आहे.
हेही वाचा: