UNSC Meet: जम्मू काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam terror attack) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (UNSC) बंद दाराआड बैठक घेतली. पाकिस्तानच्या विनंतीनंतर झालेल्या या बैठकीचा कोणताही ठोस निकाल लागला नसल्याची माहिती आहे. काल (सोमवारी) दुपारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत दीड तासांच्या बंद दाराआड झालेल्या बैठकीनंतर पाकिस्तानला लाजिरवाण्या भूमिकेचा सामना करावा लागला. या बैठकीनंतर, संयुक्त राष्ट्रांनी कोणतेही अधिकृत निवेदन जारी केले नाही किंवा कोणताही ठराव मंजूर झाला नाही. (Pahalgam terror attack)
बैठकीदरम्यान, संयुक्त राष्ट्रांमधील पाकिस्तानचे स्थायी प्रतिनिधी, राजदूत असीम इफ्तिखार यांनी सांगितले की, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीचे उद्दिष्ट साध्य झाले आहे. या बैठकीत पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरचा प्रश्न सोडवण्यावरही चर्चा केली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ही बैठक संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर झाली, ज्यामध्ये त्यांनी म्हटले होते की, भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थिती अलिकडच्या काळात सर्वात वाईट पातळीवर पोहोचली आहे.
बैठकीत पाकिस्तानचे स्थायी प्रतिनिधींनी काय म्हटलं?
या बैठकीत पाकिस्तानने सतत खोटी विधाने केली. भारताने सिंधू नदी करार स्थगित करण्याच्या हालचाली बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. यामुळे या प्रदेशातील शांतता आणि सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे. यावेळी त्यांनी प्रादेशिक आणि जागतिक सुरक्षेसाठी यामुळे गंभीर धोका निर्माण होत असल्याचा दावा करत काश्मीरला आंतरराष्ट्रीय वाद म्हणून सादर करण्याचा प्रयत्न केला. अटारी सीमा बंद करणे, राजनैतिक संबंध आणखी कमी करणे आणि दहशतवादाविरुद्ध भारताची कठोर आणि निर्णायक भूमिका यासारख्या भारताच्या कृतींमुळे या प्रदेशात अस्थिरता वाढत आहे, असं सगळं पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला पटवून देण्याचा प्रयत्न केला. या बैठकीनंतर असीम इफ्तिखार यांनी दावा केला की, त्यांच्या मागणीनुसार UNSC ची बैठक आयोजित होणे हा त्यांचा राजनैतिक विजय आहे.
पाकिस्तान हा संयुक्त राष्ट्रांचा अस्थायी सदस्य आहे आणि त्याने सध्याच्या परिस्थितीबाबत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला या विषयावर चर्चा करण्याची विनंती केली होती. 15 सदस्यीय UNSC चे अध्यक्षपद मे महिन्यासाठी ग्रीककडे आहे आणि 5 मे रोजी पाकिस्तानसोबत बैठकीचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे. पाकिस्तानच्या कृती पाहून भारतानेही कडक भूमिका घेतली आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी चीन आणि पाकिस्तान वगळता सुरक्षा परिषदेच्या जवळजवळ सर्व सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केली आहे. जयशंकर यांनी ग्रीक परराष्ट्र मंत्री जॉर्ज गेरापेट्रिस यांच्याशीही चर्चा केली. ग्रीसनेही पहलगाम हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त केले आणि म्हटले की, "आम्ही सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध करतो." जयशंकर यांनी अमेरिका, रशिया, फ्रान्स, ब्रिटन, दक्षिण कोरिया, डेन्मार्क, अल्जेरिया, सिएरा लिओन, गयाना, स्लोव्हेनिया, सोमालिया आणि पनामा यासह अनेक देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केली आहे. सुरक्षा परिषदेत सध्या पाच स्थायी सदस्य आहेत - अमेरिका, रशिया, फ्रान्स, ब्रिटन आणि चीन - ज्यांना व्हेटो पॉवर आहे. याशिवाय, 10 तात्पुरते सदस्य देश आहेत, पाकिस्तान, ग्रीस, डेन्मार्क, अल्जेरिया, गयाना, पनामा, दक्षिण कोरिया, सिएरा लिओन, स्लोव्हेनिया आणि सोमालिया.