Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरमधील पहलगाम (Jammu Kashmir Pahalgam Terror Attack) इथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामध्ये निष्पापांना आपला जीव गमवावा लागला आहे. जम्मू काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या वैसरन घाटी भागात दहशतवाद्यांनी काल (मंगळवारी) पर्यटकांतर केलेल्या बेछूट गोळीबारात 26 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. दहशतवादी पोलिसांच्या वेशात होते. त्यामुळे पर्यटकांना त्यांचा संशय आला नाही. हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण 6 पर्यटकांचा मृत्यू झाला. यामध्ये डोंबिवलीच्या तिघांचा समावेश आहे. तर पुण्यातील दोन आणि पनवेलच्या एका पर्यटकाचा मृत्यू झाला. डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला. पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे या मित्रांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. तर पनवेलमधील दिलीप देसले यांचाही हल्ल्यात मृत्यू झाला. या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे. त्यानंतर आज डोंबिवलीतील लेले, जोशी आणि मोने यांच्या कुटुंबातील मुलांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
डोंबिवलीचे संजय लेले यांचा मुलगा हर्षल लेले बोलताना म्हणाला, बाबांना गोळी डोक्यात मारली. तेव्हा माझा हात डोक्याजवळ होता. मला वाटलं की माझ्या हाताला गोळी लागली. कारण माझा हात रक्ताने माखला होता. तिथे घोडे फक्त जातात. बाकी गाड्या जात नाहीत. घोड्यावरून खाली आणायला 3 तास लागतात. माझ्या आईला पॅरलिसीस आहे. त्यानंतर तिला खाली आल्यानंतर रुग्णालयात नेलं. मी आणि माझा भाऊ चालत खाली आलो. फायरिंग अडीच वाजता झाली. दुपारी आम्ही खाली आलो साडे पाच ते सहा वाजता. आम्ही त्या दरम्यान सुन्न होतो. नंतर मला कळलं की तीन जणांचा मृत्यू झाला आहे. सकाळी 7 वाजता मी बॉडी आइडेंटिटी फाय करायला गेलो आणि त्यानंतर मी सांगितलं की हे सगळं झालं, असंही त्याने म्हटलं आहे.
सुरवातीला वाटलं शूटिंगचा आवाज आला. आम्हाला वाटलं गेमिंगचा आवाज आहे. नंतर त्या ठिकाणच्या लोकांनी सांगितलं तुम्ही खाली बसा. नंतर हे आतंकवादी विचारात होते, तुमच्यातलं हिंदू कोण आहे? मुस्लिम कोण आहे? माझ्या काका हेमंत जोशी त्यांनी हात वरती केला. त्यांना गोळी मारली. नंतर माझ्या वडिलांना जे वाचवायला गेले त्यांच्या डोक्यात गोळी मारली. माझ्या हाताला लागून ती गोळी माझ्या बाबांच्या डोक्याला लागली आणि रक्त यायला लागलं असा थरारक प्रसंग डोंबिवलीचे संजय लेले यांचा मुलगा हर्षल लेले यानी सांगितले.
या दहशतवाद्याना शूट केलं पाहिजे ते कुठेही असो. ऑर्डर द्यायला पाहिजे कोणत्याही बॉर्डरवर ते असो. ते तीन चार वेळेस एकच वाक्य बोलत होते. हिंदू कोण आहे मुस्लिम कोण आहे? दहशवाद्याच्या डोक्याला गोप्रो कॅमेरा होता. दहशतवादी आमच्यासमोर होते, पाच दहा मिनिटं, हे मी स्वतः पाहिलं. ते गोळ्या घालून पळून गेले. डोंगराळ परिसर होता, त्यात ते पळून गेले. परिसरात मोठं ग्राउंड होतं, 5 मिनिटापेक्षा अधिक काळ फायरिंग झाली नाही. अगदी थोडा वेळ फायरिंग झाली.तिथे सुरक्षा व्यवस्था नव्हती, असंही त्याने यावेळी बोलताना सांगितलं.
पुढे बोलताना हर्षल लेले म्हणाला, स्थानिकांना आम्हाला सांगितलं की, जखमींना मदत करायला आर्मी येईल, आधी तुम्ही जीव वाचवून निघून जा. तिकडे घोड्यांनी वर जायला तीन तास लागतात, तिकडे फक्त घोडे जातात. घोडेवाले सगळे आले, जमत होते त्यांना घोडा दिला, बाकी सगळे चालत उतरले. घोड्यावरुन तीन तासांचा स्पॉट, चालत उतरायला चार तास लागले. माझ्या आईला डाव्या बाजूला पॅरालिसिस आहे. तिला मी आणि माझ्या बाबांनी उचलून खाली आणल्यातं त्याने सांगितलं. मी आणि माझा भाऊ चार तास चालत खाली आलो. पहलगाम क्लबला आम्ही चार तास बसून होतो, काहीच माहिती नव्हती. मला नंतर अधिकाऱ्यांनी सांगितलं तिघांचा मृत्यू झाला आहे, पण कोणाला सांगू नकोस, असेही ते म्हणाले.
अनुष्का मोने पतीच्या आड झाल्या मात्र...
अतुल मोने यांच्या पत्नीने सांगितलं, आम्ही जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये गेलो होते. तिथे भरपूर गर्दी होती. सगळे खूप खुश होते. सगळे आनंदी होते. आम्ही फोटो वगैरे काढत होतो. उन होतं म्हणून आम्ही पाणी पिण्यासाठी आणि जेवण करण्यासाठी गेलो. आमचं खाऊन झालं. त्यानंतर आम्हाला फायरिंगचा आवाज आला. पण आम्हाला वाटलं की पर्यटनस्थळ आहे, त्यामुळे एखादा खेळ असावा, असं समजून आम्ही लक्ष दिलं नाही. पण नंतर अचानक फायरिंग चालू झाली. सगळीकडे गोंधळ उडाला. सगळेच लोक घाबरले. आम्ही सगळे खाली झोपलो, पण नंतर आम्हाला ते विचारायला लागले की हिंदू कोण आणि मुस्लीम कोण असे आम्हाला विचारत होते. पण त्यांना कोणीही उत्तर दिलं नाही. आम्ही कोणीही वेगळे झालो नाही. आमच्यातील एकजण बोलला की तुम्ही असे का करताय, आम्ही काय केलं?पण दहशतवाद्यांनी त्यांना गोळ्या घातल्या. माझे पती म्हणाले की गोळ्या घालू नका. आम्ही काहीही करत नाही. आम्ही इथे बसतो. ते बोलत असतानाच त्यांनाही गोळ्या घालण्यात आल्या, आम्ही आमच्या माणसांना वाचवण्याचा प्रयत्न करत होतो. पण आम्ही काहीच करू शकलो नाही, अशी आपबिती त्यांनी यावेळी सांगितली.
परत त्यांनी विचारलं की हिंदू कोण आहे? असं विचारलं. माझ्या जिजूने हात वरती केला. त्यांनाही दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या. आमच्या घरातले कर्ते पुरुष होते. अशा बऱ्याच जणांना त्यांनी तिथे मारलं. दहशतवादी गेल्यानंतर आम्ही माझ्या पतीला तसेच इतरांना हलवण्याचा, उठवण्याचा खूप प्रयत्न केला. आम्ही काहीच करू शकलो नाही,” असा हृदय पिळवटून टाकणारा अनुभव त्यांनी सांगितला. यादरम्यान दहशतवादी म्हणत होते की तुम्ही या ठिकाणी दहशत माजवली आहे. पण पर्यटकांनी तिथे नेमकं काय केलं? हे मला तरी समजलं नाही. सरकारने आम्हाला न्याय दिला पाहिजे, अशी मागणी अनुष्का मोने यांनी केली आहे.