Pahalgam Terror Attack : जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारूक अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांनी पहलगाममधील दहशतवाद्यांना ‘राक्षस’ असे संबोधले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दहशतवाद्यांविरोधात जो कोणताही कठोर निर्णय घेतील, त्यांना आपण पाठिंबा देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.

२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत फारूक अब्दुल्ला म्हणाले, "जे लोक निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी, विश्रांतीसाठी गेले होते, त्यांना उभं करून त्यांचा धर्म विचारला गेला आणि मग गोळ्या झाडण्यात आल्या. असे करणारे माणूस नाहीत, ते 'राक्षस' आहेत. त्यांच्यावर असं काही केलं पाहिजे जे याआधी कधीच झालं नसेल. या घटनेचा जगभर निषेध झाला. अशी काही घटना घडायला नव्हती हवी. हे सगळं थांबायलाच हवं, असे त्यांनी म्हटले आहे.  

मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत

एक नागरिक म्हणून मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहे. ते जो निर्णय घेतील, त्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे. सर्वांना हवंय की दहशतवादाचा अंत व्हावा. जो कोणी या मागे आहे, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. मग तो कुठलाही देश का असेना.  कारगिलच्या वेळी त्याने (पाकिस्तानने) म्हटलं की मी जबाबदार नाही. मुंबई हल्ल्यानंतरही त्यांनी तेच सांगितलं. पण बंदूक तुम्हीच देत आहात. आपणच मसूद अजहरला सोडून दिलं, आणि मी त्यावेळी त्याचा विरोध केला होता, असेही फारूक अब्दुल्ला यांनी म्हटले. 

दहशतवादाची फॅक्टरी संपवावी लागेल 

फारूक अब्दुल्ला पुढे म्हणाले की, "दहशतवादाची फॅक्टरी आता संपवावीच लागेल. जेव्हा जेव्हा हल्ला झाला आहे, तो पाकिस्तानकडूनच झाला आहे. आपण कधीच सुरुवात केली नाही, सुरुवात त्यांनीच केली. मग आपण प्रत्युत्तर दिलं. आपण मानवतेचे समर्थक आहोत. हा महात्मा गांधींचा देश आहे. पाकिस्तानसोबत संवादाच्या प्रश्नावर फारूक अब्दुल्ला म्हणाले कि, "मला याचा खेद आहे की मी पूर्वी त्यांच्या (पाकिस्तानच्या) सोबत संवादाची भाषा बोलत होतो. पण ते बोलायलाच तयार नाहीत. काश्मीर पाकिस्तानसोबत जाऊ शकतो का? कधीच नाही! ज्यांना पाकिस्तानमध्ये जायचं होतं, ते बऱ्याच आधीच गेले आहेत."

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू

दरम्यान, जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर मोदी सरकारने पाकिस्तानविरोधात अनेक राजनैतिक पावले उचलली असून, लवकरच सरकार पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई करू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे पाकिस्तानची चिंता वाढल्याचे दिसून येत आहे. 

आणखी वाचा 

Pahalgam Terror Attack मोठी बातमी : पाकव्याप्त काश्मीरमध्ये हमासची एन्ट्री; धडकी भरवणारा व्हिडीओ, नवं कनेक्शन उघड?