नवी दिल्ली : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terrorist Attack) पाकिस्तानविरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. याच पार्श्वभूमीवर जम्मू-कश्मीरचे माजी पोलिस महासंचालक (DGP) एस. पी.  वैद्य यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. पाकिस्तानचे चार तुकडे होणार हे निश्चित आहे, त्यामुळे पाकव्याप्त काश्मीर (PoK) घेण्याची हीच योग्य वेळ असल्याचं ते म्हणाले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय लष्कराला पाकिस्तानवर कारवाई करण्यासाठी पूर्ण मुभा दिली आहे. त्यामुळे लष्कर आता काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. 

एस. पी.  वैद्य यांनी पुढे स्पष्ट केले की, पीओके भारतात पुन्हा समाविष्ट करण्याबाबत भारतीय संसदेत आधीच ठराव मंजूर झालेला आहे. पाकिस्तानमधील सध्याची स्थिती पाहता, हा देश तुकडे होण्याच्या मार्गावर आहे. पाक लष्कराची इतकी बिकट अवस्था आहे की, त्यांना बलुचिस्तानमध्येसुद्धा प्रभाव दाखवता येत नाही. खैबर पख्तूनख्वा (KPK) प्रांतातील सुमारे 60 टक्के भागातून पोलिस आणि लष्कराने माघार घेतली आहे. ही बाब भारताच्या पथ्यावर पडणारी असेल. 

लष्कराच्या हुकूमशाहीला लोक कंटाळले

सिंध प्रांतातील बंडखोरांनी बलुच लिबरेशन आर्मी (BLA) सोबत युती केली आहे. भारतासोबत युद्धाची स्थिती उद्भवली, तर हे तिन्ही प्रदेश स्वतंत्रता जाहीर करतील. इम्रान खान यांना तुरुंगात टाकण्यामागे लष्करी दबाव कारणीभूत आहे आणि या प्रकारच्या हुकूमशाहीविरुद्ध लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे असं मत एस पी वैद्य यांनी व्यक्त केलं. 

पाकिस्तानचे चार तुकडे होणे अटळ

एस. पी.  वैद्य यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, पाकिस्तानचे कोणतेही लष्करप्रमुख देशात राहत नाहीत. त्यांना पाकिस्तानबद्दल फारशी निष्ठा उरलेली नाही. पाकिस्तानात सध्या एक खुले पत्र फिरते आहे, ज्यात विचारले गेले आहे की, 'तुमची लढाई आम्ही का लढावी?'

पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर आदेश देतात आणि पंतप्रधान त्यांचे ऐकतात.  यावरून तिथल्या पंतप्रधानांकडे प्रत्यक्षात कोणतीही सत्ता नाही हे उघड होते. देशात लष्कर असते, पण पाकिस्तानमध्ये तर लष्करच देश चालवत आहे असं एस. पी.  वैद्य म्हणाले. 

ज्या दिवशी पाकिस्तानवर भारताचा लष्करी हल्ला होईल, त्या दिवशी तिथले लोक भारतीय लष्कराचे स्वागत करतील. पाक लष्करप्रमुख अलीकडे लोकांसमोर दिसतही नाहीत,  ते इतके भयभीत झाले आहेत असं मत एस. पी.  वैद्य यांनी व्यक्त केलं.