नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर ( Mani Shankar Aiyar) यांनी केलेल्या वक्तव्याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे. माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव ( PV Narasimha Rao) हे काँग्रेसमधील भाजपचे पहिले पंतप्रधान होते अशी टीका अय्यर यांनी केली. राव यांचा जातीयवादी विचारांकडे कल असल्याचेही त्यांनी म्हटले.
परराष्ट्र विभागाचे अधिकारी असलेल्या अय्यर यांनी राजकारणात प्रवेश केला. अय्यर यांच्या 'मेमरीज ऑफ ए मॅव्हरिक... द फर्स्ट फिफ्टी इयर्स (1941-1991) ("Memoirs of a Maverick -- The First Fifty Years (1941-1991)") या आत्मचरित्रपर पुस्तकाचे अनावरण झाले. या निमित्ताने ज्येष्ठ पत्रकार वीर संघवी यांच्यासोबत झालेल्या वार्तालापाच्या वेळी मणिशंकर अय्यर यांनी विविध मुद्यांवर थेट भाष्य केले. यावेळी प्रेक्षकांमध्ये काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यादेखील उपस्थित होत्या.
या वार्तालापात त्यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याशी असलेल्या संबंधांपासून ते डिसेंबर 1978 पासून ते जानेवारी 1982 या कालावधीत कराचीमध्ये महावाणिज्यदूत म्हणून काम करण्यापर्यंतच्या अनुभवाबाबतही अय्यर यांनी भाष्य केले. प्रश्नोत्तराच्या सत्रादरम्यान बाबरी मशीद प्रकरण हाताळताना राजीव गांधी यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल विचारले असता, अय्यर यांनी शिलान्यास करण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे माझे मत असल्याचे त्यांनी म्हटले.
अय्यर यांनी म्हटले की, आर. के. धवन यांना पंतप्रधान कार्यालयात नियुक्ती देणे ही राजीव गांधींनी केलेली सर्वात मोठी चूक होती असेही अय्यर यांनी म्हटले. धवन यांच्या काळात पंतप्रधान कार्यालयाचे राजकीयकरण झाले. त्याआधी पीएमओ कार्यालय हे कोणत्याही राजकारणाशिवाय निर्णय घेण्याचा सल्ला देत होते.
पीव्ही नरसिंह राव हे किती जातीयवादी विचारांचे होते, यावरही अय्यर यांनी भाष्य केले. राम-रहीम यात्रेच्या वेळी नरसिंह राव यांच्यासोबत झालेला संवाद त्यांनी सांगितला. नरसिंह राव यांनी मला सांगितले की, त्यांचा माझ्या यात्रेवर कोणताही आक्षेप नाही, परंतु त्यांनी माझ्या धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येशी असहमत आहे. मी सांगितले की माझ्या धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येत काय चूक आहे असा प्रश्न विचारला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, हा देश हिंदूंचा आहे. मी माझ्या खुर्चीत बसलो असलो तरी भाजपचेही तेच म्हणणे असल्याचे अय्यर यांनी सांगितले. भाजपचे पहिले पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी नव्हते, तर "पहिले भाजपचे पंतप्रधान" राव होते अशी टीकाही अय्यर यांनी केली.
पी. व्ही. नरसिंह राव यांनी 1991 मध्ये काँग्रेस सरकारचे नेतृत्व केले. 1991 ते 1996 पर्यंत त्यांनी भारताचे नववे पंतप्रधान म्हणून काम केले. त्यांच्याच कार्यकाळात बाबरी मशीद पाडण्यात आली.