Chandrayaan 2 Land : 23 ऑगस्ट 2023 या दिवसाची भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद झाली. भारताच्या चांद्रयान 3 ने (Chandrayaan 3) चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लॅण्डिंग करुन ऐतिहासिक कामगिरी केली. भारतच नव्हे तर संपूर्ण जग हे लॅण्डर विक्रम आणि रोवर प्रज्ञान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याच्या क्षणाचे साक्षीदार बनले. जिद्द, सातत्य आणि अपार मेहनतीच्या जोरावर भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या (ISRO) शास्त्रज्ञ आणि इंजिनिअर्सनी ही मोहीम फत्ते करुन दाखवली. जगभरात भारताचा आवाज बुलंद करणाऱ्या या चांद्रयान 3 मोहिमेचं नेतृत्त्व पुरुषांनी केलं, परंतु जवळपास 54 शास्त्रज्ञ आणि इंजिनिअर महिलांनी (Women) या मोहिमेत थेट महत्त्वाची जबाबदारी पेलली.


चांद्रयान 3 'ऑल मेन' मोहीम, मात्र पडद्यामागे 54 शास्त्रज्ञ, इंजिनिअर महिला


चांद्रयान 2 आणि चांद्रयान 3 या दोन मोहिमेतील सर्वात मोठा फरक म्हणजे या मोहिमेचं नेतृत्त्व करणारे शास्त्रज्ञ. चांद्रयान 2 ही मोहिमेत प्रमुख पदांवर महिला होत्या. प्रोजेक्ट डायरेक्टर एम वनिता आणि मिशन डायरेक्टर रितु करिधल श्रीवास्ताव यांचा त्यात समावेश होता. तर चांद्रयान 3 मोहीम ही 'ऑल मेन' होती. चांद्रयान 3 चे मिशन डायरेक्टर मोहन कुमार, व्हेईकल/रॉकेट डायरेक्टर बिजू सी थॉमस आणि स्पेसक्राफ्ट डायरेक्टर डॉ. पी विरामुथुवेल हे आहेत. मोहिमेचं नेतृत्त्व पुरुषांनी केलं असलं तरी या मोहिमेत पडद्याच्या मागे 54 शास्त्रज्ञ आणि इंजिनिअर महिला कार्यरत होत्या, ज्यांनी आपल्या खांद्यावर चांद्रयान मोहीम पेलली आणि यशस्वीरित्या पूर्ण देखील केली.


कोणावर कोणती जबाबदारी?


इस्रोच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, चांद्रयान मोहिमेत सुमारे 54 महिला इंजिनिअर आणि शास्त्रज्ञ आहेत, ज्यांनी थेट चांद्रयान 3 मोहिमेत काम केलं होतं. विविध केंद्रांवर काम करणाऱ्या विविध यंत्रणांच्या सहाय्यक, उपप्रकल्प संचालक, प्रकल्प व्यवस्थापक या महिला आहेत. या सगळ्यांनी आपल्या कौशल्य आणि समर्पणाने मोहीम यशस्वी करण्यासाठी योगदान दिलं.


श्रीहरिकोटा रॉकेट स्टेशनच्या अधिकारी पी. माधुरी चांद्रयान-3 मोहिमेचा एक महत्त्वाचा भाग होत्या. रॉकेट प्रक्षेपणाच्या वेळी त्यांनी समालोचकाची भूमिका बजावली होती. चांद्रयान-3 हे 14 जुलै 2023 रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आलं होतं. याचे नेतृत्व भारताची 'रॉकेट वुमन' अशी ओळख असलेल्या रितू करिधल श्रीवास्तव यांनी केलं होतं.


रुढीवादी विचारांना छेद


भारतीय महिलांनी नऊ वर्षांपूर्वीच अवकाशात आपला पराक्रम जगासमोर दाखवायला सुरुवात केली होती. जेव्हा भारतीय महिला शास्त्रज्ञांनी मंगळ ग्रहाच्या कक्षेत उपग्रह स्थापित केल्यानंतर महिलाशक्ती पाहायला मिळाली होती. त्यावेळचा एक फोटो व्हायरल झाला होता. ज्यात सुंदर साडी नेसलेल्या, केसात गजरा माळलेल्या महिला बंगळुरु इथल्या इस्रोच्या कार्यालयात जल्लोष करताना दिसल्या होत्या. इस्रोच्या माहितीनुसार, जल्लोष करणाऱ्या या फोटोतील काही महिला प्रशासकीय कर्मचारी होत्या. तर या ग्रुपमध्ये मिशनवर काम करणाऱ्या आणि लॉन्चच्या वेळी नियंत्रण कक्षात असलेल्या अनेक महिला शास्त्रज्ञही सामील होत्या, यात रितु करिधल, अनुराधा टीके, नंदिनी हरिनाथ यांचा समावेश होता. 


आता पडद्यामागे राहून 54 महिला शास्त्रज्ञ आणि इंजिनियर महिलांनी चांद्रयान 3 मोहीम यशस्वी करण्यात मोलाची भूमिका बजावली. खरंतर रॉकेट सायन्स किंवा अंतराळ संशोधन हे पुरुषप्रधान क्षेत्र आहे, इथे पुरुषांची मक्तेदारी चालते, या रुढीवादी विचारांना छेद देण्याचं काम या मोहिमेने केलं. शिवाय महिला या आव्हानात्मक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करु शकतात, हे देखील या मोहिमेतून सिद्ध झालं. 


हेही वाचा


चिकाटीच्या जोरावर ISRO मध्ये रुजू, चांद्रयान-3 मोहीमेत मोलाचा वाटा; कोण आहेत वैज्ञानिक कल्पना कालाहस्ती?