नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या ताज्या परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (27 एप्रिल) सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. पंतप्रधान म्हणाले की, कोरोनाचे आव्हान अद्याप पूर्णपणे संपलेलं नाही ही सत्य परिस्थिती आहे. ओमिक्रॉन आणि त्याची सर्व व्हेरिएंट कसे गंभीर परिस्थिती निर्माण करु शकतात, हे आपण युरोपातील देशांमध्ये पाहू शकतो. सर्व पात्र लहान मुलांचं लसीकरण लवकरात लवकर करणे हे आमचे प्राधान्य असल्याचे मोदी म्हणाले. त्यासाठी पूर्वीप्रमाणेच शाळांमध्येही विशेष मोहीम राबवावी लागणार आहे."


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (27 एप्रिल) कोविड संदर्भात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. कोविडबाबतीत पंतप्रधान यांनी घेतलेली ही 24 वी बैठक आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील या बैठकीत सहभागी झाले होते. सहभागी झालेल्या मुख्यमंत्र्यांपैकी कोविड संसर्गात लक्षणीय वाढ झालेल्या दिल्ली, उत्तर प्रदेश, मिझोराम, कर्नाटक, हरियाणा या पाच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या उपाययोजनांची माहिती दिली.





 

ही प्रत्येक नागरिकासाठी अभिमानाची बाब आहे की आपल्या प्रौढ लोकसंख्येपैकी 96% नागरिकांना कोरोना लसीच्या पहिल्या डोस दिला आहे. तर 15 वर्षांवरील वयाच्या पात्र लोकसंख्येपैकी 85% लोकांना कोविड-19 लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. इतर देशांच्या तुलनेत कोविड संकट चांगल्या प्रकारे हाताळूनही आपल्या काही राज्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्येमध्ये वाढ पाहत आहोत. त्यामुळे आपल्याला सतर्क राहावं लागेल. कोविडचं संकट अद्याप टळलेलं नाही, असं कोविड-19 परिस्थितीवर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले.



राज्य आणि केंद्र यांच्यात समन्वय खूप महत्त्वाचा आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे पुरवठा प्रभावित झाला आहे ज्यामुळे अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. त्यामुळे सहकारी संघराज्य महत्त्वाचं आहे. आजच्या कोविड आढावा बैठकीत मनुष्यबळ आणि वैद्यकीय पायाभूत सुविधांच्या वाढीवरही चर्चा झाली, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.