भोपाळ : मी बाबरी मशीद पाडायला गेले होते, आम्ही मिळून मशीदीचा ढाचा पाडला आणि आता मंदिर बांधायलादेखील जाणार असल्याचे नवे वादग्रस्त विधान साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केले आहे. साध्वी यांच्या या नव्या विधानामुळे निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी त्यांना नोटीस बजावली आहे.

प्रज्ञा सिंह ठाकूर एका टीव्ही चॅनेलवरील कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या, यावेळी त्या राम मंदिराबाबत बोलल्या की, "मी बाबरी मशीद पाडायला गेले होते, आम्ही मिळून मशीदीचा ढाचा पाडला आणि आता मंदिर बांधायलादेखील जाणार आहे. मी पूर्ण आत्मविश्वासाने बोलत आहे, कारण प्रभू श्रीराम माझे आदर्श आहेत. त्यांच्यावर माझी भक्ती आहे. राम राष्ट्र आहे, राष्ट्रही राम आहे, त्यामुळे भव्य राम मंदिर बनवण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही."

VIDEO | ...म्हणून साध्वी प्रज्ञाला उमेदवारी, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्पष्टीकरण | एबीपी माझा



भोपाळमधील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर सातत्याने वादग्रस्त विधानं करत आहेत. दोन दिवसांपूर्वी साध्वी प्रज्ञा यांनी मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरेंबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. साध्वी म्हणाल्या होत्या की, "हेमंत करकरेंना मी शाप दिला होता, म्हणून त्यांचा दहशतवादी हल्ल्यात सर्वनाश झाला." याप्रकरणी साध्वींना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली होती. आज नव्या वादग्रस्त विधानामुळे साध्वींना भोपाळमधील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अजून एक नोटीस बजावली आहे.

VIDEO | शत्रुपक्षाचं मनोबल वाढू नये म्हणून विधान मागे : साध्वी प्रज्ञा सिंह | एबीपी माझा