2024 Election News : 2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी (2024 Loksabha Election) भाजपविरोधी मोट बांधण्यासाठी विरोधकांचे प्रयत्न सुरु आहेत. विरोधी पक्षांच्या आघाडीबाबत राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. युतीमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला काय? कोणत्या जागांवर कोण उमेदवार असणार आणि राज्यनिहाय युतीची रचना काय असेल? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पाटणा येथे विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात चर्चा होणार आहे. लोकसभेच्या ४५० जागांवर विरोधकांकडून भाजपविरोधी एकच उमेदवार देण्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 


पाटणामध्ये होणाऱ्या बैठकीत 3 राष्ट्रीय पातळीवरील पक्ष, 12 राज्यस्तरीय पक्ष आणि 4 छोटे पक्ष सामील होणार आहेत. विरोधी आघाडीत समन्वय समिती स्थापन करण्याची चर्चा सुरु आहे. या समितीकडे किमान समान कार्यक्रम आणि जागावाटपाचा वाद सोडविण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. याबाबत जेडीयूचे सल्लागार आणि समाजवादी नेते केसी त्यागी म्हणाले की, देशातील 450 लोकसभेच्या जागांवर विरोधी पक्षाकडून उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. 


नितीश कुमारांनी बोलावल्या बैठकीत कोणाचा समावेश होणार?


काँग्रेस, आप आणि सीपीएम  सपा, टीएमसी, शिवसेना (यूबीटी), एनसीपी, जेएमएम, सीपीआय, डीएमके, नॅशनल कॉन्फरन्स, मुस्लिम लीग, एमडीएमके हे सर्व पक्ष पाटणा येथील बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या सर्व पक्षांना आमंत्रण पाठवण्यात आले आहे. याशिवाय केरळ काँग्रेस (मणी), आरएसपी, व्हीसीके या छोट्या पक्षांनाही आघाडीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. नितीश कुमार यांच्या शासकीय निवासस्थानी सर्व नेत्यांची बैठक होण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप जागा निश्चित झालेली नाही.


उत्तर प्रदेश


उत्तर प्रदेशमध्ये भाजप विरोधात चार पक्ष एकत्र येऊ शकतात. यामध्ये सपा, काँग्रेस, आरएलडी आणि आझाद समाज पक्षांचा समावेश आहे. सपा, काँग्रेस आणि एएसपी यांची आधीच युती आहे. काँग्रेस लोकसभेत या आघाडीसोबत जाऊ शकते. उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या सर्वाधिक 80 जागा आहेत. 2019 मध्ये आरएलडी, सपा आणि बसपा यांनी एकत्र निवडणूक लढवली होती, तर काँग्रेसने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. सपा आघाडीने 15 जागा जिंकल्या होत्या, तर एनडीएला 64 आणि काँग्रेसला एक जागा मिळाली होती.


महाराष्ट्र 


महाराष्ट्रात काँग्रेस, शिवसेना (UBT) आणि NCP एकत्र निवडणुका लढवतील. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. 16-16-16 जागांचा फॉर्म्युला लागू करण्याची काँग्रेसची मागणी आहे. उद्धव ठाकरेंनी 18 जागांवर दावा केला आहे. 2019 मध्ये उद्धव यांच्या पक्षाला 18 जागा मिळाल्या होत्या. राष्ट्रवादीचे अजित पवार यांनीही उद्धव यांच्या या दाव्याला पाठिंबा दिला आहे. अशा स्थितीत शिवसेनेला (यूबीटी) 18 तर राष्ट्रवादी-काँग्रेसला 15-15 जागा मिळू शकतात, असे मानले जात आहे. महाराष्ट्रात अशा जवळपास 10 जागा आहेत जिथे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भांडणे होऊ शकतात. पुणे आणि मुंबई झोनमध्ये जास्त जागा आहेत. काँग्रेसलाही दक्षिण मुंबईवर आपला दावा कायम ठेवायचा आहे. ही जागा देवरा घराण्याचा बालेकिल्ला आहे.


पश्चिम बंगाल


 पश्चिम  बंगालमधील जागावाटपाची कमान तृणमूल या मोठ्या पक्षाच्या हातात असेल. बंगालमध्ये लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. 2014 मध्ये तृणमूलला 34, काँग्रेसला 4 आणि सीपीएमला 2 जागा मिळाल्या होत्या. यावेळीही हे तीन पक्ष महायुतीत सामील होणार असल्याची चर्चा आहे. 2019 मध्ये, तृणमूल कॉंग्रेसच्या जागा 22 आणि कॉंग्रेसला 2 जागा मिळाल्या.  2019 मध्ये सीपीएमला एकही जागा जिंकता आली नाही. मात्र, पक्षाची मते 6 टक्क्यांच्या आसपास राहिली. बंगालमध्ये तृणमूल 32, काँग्रेस 6 आणि सीपीएम 4 जागा लढवू शकते.


बिहार


बिहारमध्ये लोकसभेच्या एकूण 40 जागा आहेत. विरोधी आघाडीतील पक्षांची संख्या 7 आहे. बिहारमध्ये फक्त 4 पक्षांना लोकसभेच्या जागा मिळाल्या आहेत. जेडीयूचे सध्या 17 लोकसभेचे खासदार आहेत, तर 2019 मध्ये काँग्रेसने 1 जागा जिंकली होती. बिहारमध्ये जागावाटपाच्या सूत्रात विजयी उमेदवाराला प्राधान्य दिल्याची चर्चा आहे. असे झाल्यास JDU-RJD 16-16, काँग्रेस 6-8  जागांवर उमेदवार उभे करू शकतात.


तामिळनाडू 


तामिळनाडूत लोकसभेच्या 39 जागा आहेत. गेल्या वेळेप्रमाणे यावेळीही द्रमुक आणि काँग्रेस एकत्र निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. डीएमके गेल्या वेळेप्रमाणे २८ जागांवर निवडणूक लढवू शकते, तर काँग्रेसला १० आणि मुस्लिम लीगला एक जागा मिळू शकते.


हरियाणा


हरियाणामध्ये लोकसभेच्या 10 जागा आहेत. इथं काँग्रेस INLD सोबत युती करून निवडणूक लढवू शकते. INLD प्रमुख ओम प्रकाश चौटाला हे नितीश कुमार यांचे निकटवर्तीय मानले जातात. आयएनएलडीच्या रॅलीत नितीशसह अनेक विरोधी नेते पहिल्यांदाच जमले होते. हरियाणात आयएनएलडी-काँग्रेसची युती झाली तर काँग्रेस ८ जागा आणि आयएनएलडी २ जागांवर निवडणूक लढवू शकते. 


तीन राज्यात जागावाटपाचा पेच 


केरळ, पंजाब आणि दिल्ली या तीन राज्यांमध्ये मध्ये जागावाटपाचा पेच आहे. कारण पंजाब आणि दिल्लीत 'आप'सोबत युती करण्यास काँग्रेस तयार नाही. मात्र नितीशकुमार यांनी अरविंद केजरीवाल यांनाही निमंत्रण दिले आहे.


7 राज्यांमध्ये केवळ 157 जागांवर काँग्रेसचे उमेदवार


मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक आणि ओडिशामध्ये काँग्रेस 157 जागांवर स्वबळावर लढणार आहे. या ठिकाणी काँग्रेसला विरोधकांचा पूर्ण पाठिंबा असेल. 2019 मध्ये या 157 पैकी काँग्रेसला फक्त 10 जागा मिळाल्या होत्या. तर मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये 120 जागांवर काँग्रेसची भाजपसोबत थेट लढत आहे. ओडिशा आणि तेलंगणामध्ये काँग्रेस प्रादेशिक पक्षांशी लढत आहे. दोन्ही ठिकाणी भाजपही मजबूत स्थितीत आहे.


कर्नाटकमध्ये काँग्रेसची भाजप आणि जेडीएससोबत लढत आहे. 2024 च्या निवडणुकीत जेडीएस भाजपसोबत एकत्र निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आसामचा निर्णय अजूनही कायम आहे. येथील युतीबाबत निर्णय घेण्याची जबाबदारी काँग्रेस हायकमांडवर टाकली जाऊ शकते, असे मानले जात आहे. आसाममध्ये लोकसभेच्या 14 जागा आहेत.


.