Operation Sindoor: जम्मू पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून बदला घेतला. आज (बुधवारी) मध्यरात्री दीडच्या सुमारास भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला. ही कारवाई 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत करण्यात आली आणि विशेष म्हणजे भारतीय सेना, नौदल आणि हवाई दल या तिन्ही दलांनी संयुक्तपणे यात भाग घेतला. 1971च्या युद्धानंतर भारताच्या तिन्ही सैन्याने पाकिस्तानविरुद्ध एकत्रितपणे कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ होती. भारतीय हवाई दलाने आज (बुधवारी) मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी स्ट्राईक करून पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला.

हल्ला केलेल्या दहशतवाद्यांच्या ठिकाणांबद्दल अधिक माहिती

1) एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या माहितीच्या आधारे दिलेल्या वृत्तानुसार, मरकज सुभान अल्लाह, जैश-ए-मोहम्मद बहावलपूर, पंजाब, पाकिस्तान - हे मरकज जैश-ए-मोहम्मदचे ऑपरेशनल मुख्यालय म्हणून काम करते. 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या पुलवामा हल्ल्यासह दहशतवादी योजनांशी संबंधित आहे. पुलवामा हल्ल्यातील गुन्हेगारांना या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आले होते, अशी माहिती आहे. 

2) 2000 मध्ये स्थापन झालेलं मरकज तैयबा हे 'अल्मा मेटर' आणि लष्करेचे सर्वात महत्वाचे प्रशिक्षण केंद्र आहे जे नांगल सहदान, मुरीदके, शेखुपुरा, पंजाब, पाकिस्तान येथे आहे, अशी माहिती एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. 

3) सरजल/तेहरा कलान येथील जैश-ए-मोहम्मद शकरगढ, जिल्हा नारोवाल, पंजाब, पाकिस्तान हे जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी जैश-ए-मोहम्मदचे मुख्य प्रक्षेपण केंद्र आहे. हे केंद्र सरजल परिसरातील तेहरा कलान गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात आहे, जेणेकरून त्यांच्या कारवाया आणि खरा उद्देश लपून राहील, यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात हे केंद्र असल्याची माहिती देखील एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

100 किलोमीटर आत घुसून हल्ला

भारताने पाकिस्तान आणि पीओकेमधील ज्या 9 ठिकाणी हवाई हल्ले केले त्यापैकी काही ठिकाणे आंतरराष्ट्रीय सीमेपासून 100 किलोमीटर अंतरावर आहेत. विशेषतः जैश-ए-मोहम्मदचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाणारे बहावलपूर आंतरराष्ट्रीय सीमेपासून 100 किलोमीटर अंतरावर आहे. तर, मुरीदके 30 किमी आणि गुलपूर 35 किमी अंतरावर आहे.

या मोहिमेत एकूण 9 दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये जैश-ए-मोहम्मदचे बहावलपूर मुख्यालय आणि लष्कर-ए-तैयबाचे मुरीदके लपण्याचे ठिकाण आहे. लष्कराच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणांहून भारतात दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन केले जात होते आणि त्यांना लक्ष्य करण्यात आले.

कसा केला हल्ला?

या कारवाईत तिन्ही दलांनी त्यांच्या अत्याधुनिक शस्त्रांचा वापर केला. विशेषतः, कामीकाजे ड्रोन (Loitering Ammunition) वापरले गेले; ही अशी शस्त्रे आहेत, जी थेट शत्रूच्या ठिकाणांवर आदळतात आणि तिथेच स्फोट घडवतात. पाकिस्तानी सैन्याच्या कोणत्याही तळावर हल्ला झाला नाही, फक्त दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले, असे लष्कराने स्पष्ट केले आहे.

पाकिस्तानवर एअर स्ट्राईक, 9 कॅम्प्स उद्धवस्त

(बहावलपूर (02), मुरीदके, मुझफ्फराबाद, कोटली, गुलपूर, भिंबर, चक आमरू, सियालकोट येथे हवाई हल्ले करण्यात आले). या हवाई हल्ल्यात या ठिकाणी असलेले अनेक दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त झाले.

1. बहावलपूर (2): जैश-ए-मोहम्मद मुख्यालय (जिथे 16 एप्रिल रोजी हमास कमांडरचे स्वागत करण्यात आले होते)

2. मुरीदके: लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय

3. मुझफ्फराबाद: हिजबुल मुजाहिद्दीनचा तळ

4. कोटली: दहशतवादी तळ

5. गुलपूर: दहशतवादाचे लाँच पॅड

6. भिंबर: दहशतवादाचे लाँच पॅड

7. चक अमरू: टेरर लाँच पॅड

8. सियालकोट: दहशतवादी तळ