नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूर पार पडल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पाकिस्तान आणि नेपाळ सीमेला लागून असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. अमित शाह यांनी या बैठकीत भारताच्या सीमेवर जे भडकवण्याचा प्रयत्न करतात, जे आमच्या सेनेला ललकारतात आणि जे आमच्या निर्दोष लोकांना मारतात अशा लोकांना ऑपरेशन सिंदूर हे सडेतोड उत्तर असल्याचं म्हटलं.
अमित शाह यांनी पाकिस्तान आणि नेपाळच्या सीमांना लागून असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. यावेळी सर्व राज्याच्या प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय सैन्याचे आभार मानले. अमित शाह यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याला नजरअंदाज न करता ऑपरेशन सिंदूर द्वारे योग्य उत्तर दिल्याचं म्हटलं. ज्यामुळं जगात एक कडक संदेश गेला आहे. ऑपरेशन सिंदूर भारताला आव्हान देणाऱ्यांना सडेतोड उत्तर आहे.
विशेष गोपनीय माहितीच्या आधारे भारतीय सुरक्षा दलांनी दहशतवाद विरोधी अभियान सुरु करुन सीमेपलीकडे दहशतवाद्यांच्या मूलभूत रचनेवर हल्लाबोल केला. अमित शाह यांनी मोदी सरकारचं हे दहशतवादाविरोधातील झिरो टॉलरन्स धोरणाचं निदर्शक असल्याचं म्हटलं.
भारतीय सैन्यानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये 9 दहशतवादी ठिकाणांवर एअर स्ट्राइक केला आहे. यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. एअर स्ट्राईक पहिल्यांता पाकव्याप्त काश्मीरमध्ये मुजफ्फराबाद येथील सवाई नाला ट्रेनिंग सेंटरमध्ये करण्यात आला. पहलगाम दहशतवादी हल्ला करणाऱ्यांनी या ठिकाणाहून प्रशिक्षण घेतलं होतं. यानंतर कोटली,बरनाला कॅम्प, अब्बास कॅम्प, सियालकोटच्या सरजल कँम्प, हिजबुलच्या महमूना जाया कॅम्प, मुरीदकेच्या मरकज तयबा कॅम्प आणि जैश हेडक्वार्टर मशीद सुभान अल्लाह बहावलपूर कॅम्प ला निशाणा बनवलं.
दरम्यान, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली उद्या सर्वपक्षीय बैठक होणार आहे. सर्वपक्षीय बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे उपस्थित राहतील. तर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून खासदार संजय राऊत उपस्थित राहणार आहेत.
युद्ध झाल्यास चीन शिवाय कोणते देश पाकिस्तानला साथ देतील, भारताच्या विरोधात कोण कोण उभं राहू शकतं?