Operation Sindoor:  भारतानं ऑपरेशन सिंदूर द्वारे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारतानं मध्यरात्री दीडच्या सुमारास पाकिस्तानातील 5 आणि पाक व्याप्त काश्मीरमधील 4 ठिकाणांवर एअर स्ट्राईक करुन दहशतवाद्यांचे अड्डे बेचिराख केले. भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये 26 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून 48 लोक जखमी आहेत. भारतानं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला 15 दिवसांनंतर घेतला आहे. 

इस्त्रायलनं भारतानं केलेल्या कारवाईचं समर्थन केलं आहे. भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार असल्याचं इस्त्रायलचे राजदूत म्हणाले. त्यांनी ऑपरेशन सिंदूरचं समर्थन केलं आहे. दुसरीकडे चीननं पाकिस्तानचं समर्थन केलं आहे. सध्या भारत पाक सीमेवर तणाव वाढलेला आहे.जर दोन्ही देशांमध्ये युद्ध झालं तर चीन शिवाय पाकिस्तानच्या बाजूनं कोण जाऊ शकतं?  

चीनचा पाकिस्तानला पुन्हा पाठिंबा

भारताकडून करण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर चीन पुन्हा एकदा पाकिस्तानच्या समर्थनसाठी पुढं आला. चीननं भारताच्या एअर स्ट्राईकवर चिंता व्यक्त केली. भारताकडून करण्यात आलेली सैन्य कारवाई खेदजनक असल्याचं चीननं म्हटलं. सद्यस्थितीमुळं चिंतीत असल्याचं चीननं म्हटलं. दोन्ही देशांनी संयम दाखवावा आणि प्रश्न आणखी गुंतागुंतीचा करु नका, असं चीननं म्हटलं.  

तुर्की पाकिस्तानच्या समर्थनार्थ

भारताच्या एअर स्ट्राईकनंतर तुर्कीनं पाकिस्तानचं समर्थन केलं आहे. तुर्कीच्या राजदूतांनी भारताचे एअर स्ट्राईक पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचं उल्लंघन असल्याचं म्हटलं. यापुढं जात त्यांनी निर्देोष लोकांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. तुर्कीनं म्हटलं की काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्राच्या प्रस्तावानं आणि काश्मीरच्या लोकांच्या इच्छेवर सोडवण्यात यावा. 

अझरबैझान पाकिस्तानसोबत  

ऑपरेशन सिंदूरनंतर अझरबैझानच्या विदेश मंत्रालयाकडून एक प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे. यामध्ये पाकिस्तानच्या विरोधात झालेल्या सैन्य हल्ल्याचा निषेध करतो असं म्हटलं गेलं आहे. ज्यामध्ये नागरिक जखमी झाले किंवा काही जणांचा मृत्यू झाला. 

दरम्यान, पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी 22 एप्रिलला पर्यटकांवर भ्याड हल्ला केला होता. त्यामध्ये एकूण 26  जणांचा मृत्यू झाला होता. या नंतर भारताकडून पाकिस्तानला कधी उत्तर दिलं जाणार याची प्रतीक्षा होती. अखेर भारतीय सैन्यानं पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणाऱ्या ठिकाणांवर एअर स्ट्राईक केले आहेत. 

भारतीय सैन्य दलांनी पाकिस्तानच्या एअर स्पेसमध्ये न जाता दहशतवादी ठिकाणांवर हल्ले केले आहेत. भारतानं पुन्हा एकदा दहशतवादापुढं झुकणार नसल्याचं दाखवून दिलं आहे. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतानं जगाला देखील ठाम संदेश दिला आहे. भारताच्या सुरक्षा दलांच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची रडारड सुरु झाली आहे.